'राष्ट्रवादी'च्या वॉर्डात 'भाजप'कडून भूमिपूजन; पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

महापालिका प्रभाग क्रमांक 22, काळेवाडी- ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. 12) झाले.

पिंपरी : महापालिका प्रभाग क्रमांक 22, काळेवाडी- ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. 12) झाले. या प्रभागातील तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे असून, एक अपक्ष आहे. भूमिपूजन मात्र, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याचे हे चिन्ह आहे का, अशीही चर्चा रंगली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, स्थानिक नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे व नगरसेविका नीता पाडाळे, उषा काळे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हनकर उपस्थित होते. रस्त्याच्या कामासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने 128 पैकी 77 जागा घेत एकहाती सत्ता मिळवली. चार सदस्यीय प्रभागात त्यांचे चार-चार नगरसेवक झाले. मात्र, प्रभाग नऊ मासुळकर कॉलनी- नेहरूनगर- खराळवाडी- गांधीनगर आणि प्रभाग क्रमांक 12 तळवडे येथील सर्वच्या सर्व म्हणजे आठही नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

प्रभाग क्रमांक 22 मध्ये तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे व एक नगरसेविका अपक्ष आहेत. त्यांच्या प्रभागात सोमवारी भूमिपूजन झाले ते मात्र, भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमाला उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, राजेंद्र जावळे, कनिष्ठ अभियंता संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, विलास पाडाळे, कैलास सानप, विनोद तापकीर, काळूराम नढे, अतुल नढे, विशाल नढे, पद्माकर जांभळे, अरुण बकाल, प्रकाश चिटणीस, संगीता कोकणे आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhumipujan from BJP in NCP's ward in Pimpri-Chinchwad