पिंपरी-चिंचवडसह मावळात भाजपचे महावितरण कार्यालयांवर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये मीटर रीडिंग न घेताच महावितरणने अंदाजे वीजबिले पाठविली आहेत. शिवाय, एक एप्रिलपासून वीजदर वाढविले आहेत.

पिंपरी : कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये मीटर रीडिंग न घेताच महावितरणने अंदाजे वीजबिले पाठविली आहेत. शिवाय, एक एप्रिलपासून वीजदर वाढविले आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट रकमेची, तर काहींना दहापट रकमेची बिले आली आहेत. ही वीजबिले दुरुस्त करून मिळावीत व वीजदर आकार कमी करावा, या मागणीसाठी शहर भाजपतर्फे महावितरण कार्यालयांवर आंदोलन करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवड शहराची महावितरणने दोन भागात विभागणी केली आहे. पिंपरी व भोसरी विभाग अशी रचना आहे. त्यांच्या अंतर्गत काही सबस्टेशन आहेत. पिंपरी विभागाचे कार्यालय पिंपरीगावात असून, भोसरी विभागाचे कार्यालय टेल्को रस्त्यावरील बालाजीनगरजवळ एमआयडीसीत आहे. पिंपरी विभागांतर्गत सर्वाधिक ग्राहक घरगुती व व्यापारी आहेत. तसेच, भोसरी विभागांतर्गत औद्योगिक व व्यापारी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना व लॉकडाउनच्या काळात सर्वच कंपन्या बंद होत्या. तरीसुद्धा भरमसाठ विजबिले आली आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाढीव दराने व अंदाजे रीडिंगनुसार आलेल्या वीजबिलांमध्ये दुरुस्ती करावी व वीजदरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी शहर भाजपने आज महावितरणच्या बिजलीनगर सबस्टेशनवर मोर्चा काढून अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन दिले. महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आला. नगरसेविका करुणा चिंचवडे, मोना कुलकर्णी, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, योगेश चिंचवडे, पल्लवी वाल्हेकर, शेखर चिंचवडे आदी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन उपअभियंत्यांना देण्यात आले. 

लोणावळ्यात वीजबिलांची होळी

लोणावळा : वीजबिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध नोंदविला. विजवितरण कंपनीच्या वतीने देण्यात आलेली वाढीव वीजबिले रद्द करत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पटांगणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नगरसेवक देविदास कडू, दिलीप दामोदरे, मंदा सोनवणे, महिला आघाडी शहराध्यक्ष योगिता कोकरे, श्रिया रहाळकर, परिजा भिलारे, विशाल पाडाळे, सुनील तावरे, राजाभाऊ खळदकर, ललित सिसोदिया, जितू ललवाणी, हर्शल होगले, कमलेश सेंगर, रुपेश नांदवटे, अनिल गायकवाड, गिरीश मुथा, दीपक कांबळे आदी उपस्थित होते. 

Image may contain: 5 people, people standing

लोणावळा हे महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यात वाढीव वीजबिल रक्कम मोजावी लागली असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या. कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, असे असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा सरकराने केली. मात्र, त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने वीजबिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्याजासह वीजबिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे रामविलास खंडेलवाल म्हणाले. भाजपतर्फे याप्रसंगी वीजबिलांची होळी करण्यात आली. संपूर्ण वीजबिल माफी मिळावी, नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन भाजपच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यु. एस. चव्हाण यांना दिले.

वडगावात निषेध

वडगाव मावळ : आघाडी सरकारच्या निषेधार्थ मावळ तालुका भाजपच्या वतीने शुक्रवारी वीजबिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुध्यक्ष रविंद्र भेगडे, सभापती, निकीता घोटकुले, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, किरण राक्षे, अरुण भेगडे, अभिमन्यू शिंदे, अनंता कुडे, सुभाष धामणकर, नारायण ढोरे, नगरसेवक किरण म्हाळस्कर, संपत म्हाळस्कर, नामदेव वारींगे, शत्रुघ्न धनवे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध केला. कोरोना व लॉकडाउनच्या काळात सर्वच गोष्टी बंद होत्या. मात्र, तरीही विजेची भरमसाट बिले आली आहेत. वाढीव वीजबिलांत सुधारणा करून सामान्य जनतेला सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आता मात्र, या घोषणेबाबत घुमजाव करून सामान्य जनतेची फसवणूक केल्याचा आरोप वक्त्यांनी केला. केलेल्या घोषणेप्रमाणे सवलत देऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp agitation on msedcl offices at pimpri chinchwad maval