दूध उत्पादकांसाठी भाजपकडून होणार आता 'हे' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने एक ऑगस्टपासून दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

वडगाव मावळ (पुणे) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने एक ऑगस्टपासून दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना गायीचे दूध भेट देऊन आंदोलनाची नोटीस दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या निवेदनात म्हटले आहे, की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विविध संकटांचा सामना करत असतानाच लॉकडाउन काळात शहरातील हॉटेल, चहाची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प दराने दूध विक्री करावी लागत आहे. परंतु, याच परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दूध दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. दूध विक्री दर पूर्वीइतकाच कायम आहे. मग शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना कमी दर का? महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांकडून रास्त दराने दूध खरेदी करण्याच्या केलेल्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज दूध उत्पादक आर्थिक संकटात आहे. गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रुपये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून ३० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची खरेदी या मागण्यांकरिता एक ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार बर्गे यांना गायीचे दूध भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, किरण राक्षे, सुनिल चव्हाण, सुभाष धामणकर, जालिंदर धामणकर, शेखर दळवी, सचिन येवले, नामदेव वारिंगे, ज्ञानेश्वर गुंड, मच्छिंद्र केदारी, बाळासाहेब गाडे, बाळासाहेब धामणकर, सुभाष तुपे, मनोहर तुपे, नारायण बोडके, अनंता वर्वे, शांताराम दरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's agitation for demands of milk producing farmers maval