थेरगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा दोघांना चावा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे थेरगाव परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.

पिंपरी : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे थेरगाव परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. परिणामी चार वर्षांची मुलगी अफिया शेख आणि अशोक महादेव वाघमारे यांना कुत्र्यांनी चावा घेतला. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या काही दिवसांपासून पडवळनगर, पवारनगर, दगडू पाटीलनगर या परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वाहनचालक, पादचाऱ्यांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. सकाळच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या चार वर्षांच्या अफिया शेख हिच्यावर कुत्र्यांनी धाव घेत चावा घेतला. थोड्याच वेळात पुढे जाऊन अशोक महादेव वाघमारे यांनाही कुत्र्यांनी चावा घेतला. त्यांनी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेतले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक प्रमोद शिंदे म्हणाले, "लोकांच्या अंगावर भटके कुत्रे धावून जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड पशूवैद्यकीय विभागाकडून भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both were bitten by dog in Thergaon