पवना नदीच्या पूररेषेत राडारोडा टाकल्याप्रकरणी 54 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

पवना नदीच्या निळ्या पूररेषेत अवैधरीत्या राडारोडा टाकून भराव टाकल्याप्रकरणी 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी : पवना नदीच्या निळ्या पूररेषेत अवैधरीत्या राडारोडा टाकून भराव टाकल्याप्रकरणी 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार कासारवाडी येथे पिंपळे गुरव ब्रिजजवळ घडला. 

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता राजेंद्र डुंबरे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जालिंदर किसन लांडे, विजया दत्तात्रेय लांडे, बाळू किसन लांडे आणि सातबारा उताऱ्यावर नावे असलेल्या अन्य 51 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारवाडी येथे पिंपळे-गुरव ब्रिजजवळ पवना नदीपात्रात निळ्या पूररेषेमध्ये आरोपींनी 18 फेब्रुवारीला अवैधरीत्या मुरूम राडारोडा टाकला. राडारोडा टाकून नदीच्या निळ्या पूररेषेत भराव केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही बाब महापालिका बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आली. त्यानंतर टाकलेला भराव काढून घेण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, आरोपींनी नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागाकडून आरोपींविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार बुधवारी (ता. 26) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case registered against 54 persons in kasarwadi