चाकणकरांना बसतोय कचऱ्याचा फास! दररोज पंधरा टनांचे संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chakan garbage Issue

वाढत्या लोकसंख्येमुळे चाकण परिसरात कचऱ्याची समस्याही दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. चाकण नगरपरिषदेकडून दर दिवसाला सुमारे १५ टन कचरा उचलला जातो.

चाकणकरांना बसतोय कचऱ्याचा फास! दररोज पंधरा टनांचे संकलन

चाकण - वाढत्या लोकसंख्येमुळे चाकण परिसरात कचऱ्याची समस्याही दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. चाकण नगरपरिषदेकडून दर दिवसाला सुमारे १५ टन कचरा उचलला जातो. खराबवाडी, वाघजाईनगर येथील दगडाच्या खाणीत तो टाकला जातो. मात्र पावसाच्या पाण्याने कचरा कुजून निर्माण होणारी दुर्गंधी, कचऱ्याला वेळोवेळी लागणाऱ्या आगीमुळे होणारे धुराचे प्रदूषण यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी बिरदवडी, खराबवाडी, वाघजाईनगरमधील नागरिकांची आहे, पण गेल्या वीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

चाकण (ता. खेड) येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील ओला, सुका कचरा दगड खाणीत टाकला जातो. ही जागा शासकीय वनविभागाची आहे. खराबवाडी, आंबेठाण, बिरदवडी या ग्रामपंचायतीचाही कचरा येथे टाकला जात असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहे. पावसाळ्यात या कचरा डेपोतून कचरा पावसाच्या पाण्याने वाहिल्याने तो चाकण -आंबेठाण या वर्दळीच्या रस्त्यावर येतो, असे भयानक चित्र निर्माण होते. कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चाकण परिसरातील कचरा डेपो इतरत्र हलवावा, अशी मागणी जोर धरत आहे. हा कचरा डेपो बंद करण्यात यावा, या मागणीसाठी खराबवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे यांनी उपोषणही केले होते.

कचरा डेपोची परिस्थिती

  • चाकण शहराची लोकसंख्या - दीड लाख

  • दररोजचा संकलित कचरा - १५ टन

  • कचऱ्यासाठी वाहने - २३

  • कचरा डेपोसाठी जागा - अद्याप स्वतंत्र जागा नाही, पाठपुरावा सुरू

  • येणारा खर्च - वर्षाला साधारणपणे दोन कोटी

  • व्यवस्थापन - कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही

चाकण नगर परिषदेने कचरा डेपोसाठी रासे (ता. खेड) येथील गायरान जागेत अडीच हेक्टर जागा मागितली आहे. त्या जागेला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे, पण रासे ग्रामपंचायतीने हरकत घेतली आहे. कचरा डेपोसाठी सर्व विभागाच्या मंजुऱ्या मिळाल्या आहेत. इतरही गावात कचरा डेपोसाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद

नगर परिषदेकडून खाणीच्या परिसरात कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी इतर ग्रामपंचायतीकडूनही कचरा टाकला जातो. त्यामुळे व्यवस्थापन करण्याचे नियोजन विस्कळीत होते. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

- विजय भोंडवे, आरोग्य विभाग

कचऱ्याची विल्हेवाट लावावी

खराबवाडी, वाघजाईनगर (ता. खेड) गावच्या हद्दीतील दगडाच्या खाणीत दररोज सुमारे ५० टन कचरा टाकला जातो, मात्र प्रशासनाकडून त्याची वेळोवेळी विल्हेवाट लावली जात नाही. या कचऱ्याला वेळोवेळी आग लागून धुरामुळे प्रदूषण होते. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे बिरदवडीचे शैलेश फडके, अमोल परदेशी, सुनील काळडोके, रोहिदास पवार, योगेश पवार, संतोष लांडे, रमेश लांडे, अजय काळडोके आदींनी सांगितले.

टॅग्स :chakangarbage news