
MIDC Worker : कामगार गेले गावाला; मालक लागले कामाला! लग्नसराईमुळे प्रचंड तुटवडा
तळेगाव स्टेशन - एकीकडे बेरोजगारीची सार्वत्रिक बोंब सुरू असताना आणि दुसरीकडे एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा गेल्या महिनाभरापासून तुटवडा निर्माण झाला आहे. लग्नसराईत परप्रांतीय अकुशल कामगार गावाकडे गेल्याने कामगारांचा तुटवडा भरून काढण्यासाठी चक्क कंपनी मालकांनाही यंत्र चालविण्याची वेळ आली आहे. एरवीही दिवसाला पाचशे रुपये हजेरीने कामावर येणारे अकुशल कामगार चक्क आठशे-नऊशे रुपये देऊनही कामावर यायला तयार नसल्याने भोसरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीमालक वैतागले आहेत.
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय कामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. होळी, शिमगा हा परप्रांतीय कामगार गावाकडे जाण्याचा काळ. मात्र, यंदा मे महिन्यांत तब्बल १४ लग्न मुहूर्त असल्याने सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. उद्योगनगरीला अकुशल कामगारांचा स्रोत असलेल्या खान्देश, मराठवाडा, विदर्भासह उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेशही त्यास अपवाद नसावा.
आपल्या आप्तेष्टांच्या, मित्रांच्या स्वतःच्या लग्नासाठी उद्योगनगरीतील अकुशल कामगार महिनाभराच्या सुट्या अन् उचल घेऊन आपापल्या गावी गेल्याचे सार्वत्रिक चित्र पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात पाहावयास मिळत आहेत. परिणामी हे अकुशल कामगार वास्तव्यास असलेल्या स्थानिक बाजारपेठा आणि आठवडे बाजारही देखील काहीसे ओस पडल्याचे दिसते. त्यामुळे तळेगाव, चाकण एमआयडीसीमधील बड्या उद्योगांना माल पुरविणाऱ्या लघु मध्यम पुरवठादार कंपन्यांच्या उत्पादनावर याचा मुख्यत्वे परिणाम झाला आहे.
उत्पादन, प्रक्रिया आणि बांधकाम क्षेत्रावर या कामगार तुटवड्याचा परिणाम जाणवत आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी चक्क नाक्यावरील बिगारी कामगारांना रोखीने रोजंदारी देऊन, गाडीत बसवून कामावर आणण्याची वेळ कंपनी व्यवस्थापनावर आली आहे. रोज बदलणाऱ्या नवख्या बिगारी कामगारांनाही थेट यंत्र चालविण्याचे काम सोपविणे जोखमीचे ठरत असल्याने मालाची चढ उतार करणे, मालाची पॅकिंग करणे याशिवाय दुसरी कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत. कंपन्यांना रोजची गरज भागविताना कामगार कंत्राटदारांच्याही नाकीनऊ आले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर लग्न कार्ये उरकून साधारणतः जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात हे परप्रांतीय पुन्हा परतण्याची कंत्राटदारांना आशा आहे.
दिवसाला साधारणतः पाचशे रुपये हजेरी एका शिफ्टला मिळते. मात्र, नऊशे रुपये आगाऊ देऊ करूनही कुणी कामावर यायला तयार होत नाही. आमच्या अशील असलेल्या कंपन्यांच्या दैनंदिन उत्पादनाला यामुळे नाहक फटका बसत आहे. पर्याय नसल्याने चक्क आठशे नऊशे रुपये हजेरी देऊ केली तरी कुणी कामावर येईना झाले आहे.
- प्रशांत गांगर्डे, कामगार कंत्राटदार, एमआयडीसी चाकण
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला साजेसे अकुशल कामगारांचे मनुष्यबळ स्थानिक पातळीवर सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे परप्रांतीय कामगारांवरील अवलंबित्व वाढले आहे. साहजिकच त्यांच्या जाण्यायेण्याचा परिणाम उत्पादनावर होतो.
- दीपक फल्ले, अध्यक्ष, उद्योग भारती
वर्षभरापासून गावाकडे गेलो नाही. या महिन्यात जवळच्या नातेवाइकांमध्ये तीन लग्नं आहेत. त्यानिमित्ताने कुटुंबीयांसह गावाकडे चाललो आहे. त्यासाठी आठ दिवसांची सुटी घेतली आहे.
- सुधाकर गायकवाड, कामगार, चाकण एमआयडीसी