अहल्यादेवी होळकर दशक्रिया घाटावरील चेंबरला भगदाड; जुनी सांगवीत नागरिकांना धोका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

गेल्या अनेक दिवसांपासून मलनिस्सारण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच, चेंबर ओव्हरफ्लो झाल्यावर त्यातून घाण पाणी थेट नदीपात्रात मिसळते.

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : "येथील पवना नदीपात्रातील अहल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाटालगत सांडपाणी व मैला वाहून नेणारा चेंबर आहे. त्याला अनेक दिवसांपासून मोठे भगदाड पडले आहे. येथे परिसरातील नागरिक दशक्रिया व अन्य पूजाविधीसाठी येतात, त्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे,'' असे मधुबन मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश ढोरे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या अनेक दिवसांपासून मलनिस्सारण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच, चेंबर ओव्हरफ्लो झाल्यावर त्यातून घाण पाणी थेट नदीपात्रात मिसळते. त्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. एकीकडे अहल्यादेवी होळकर दशक्रिया घाटावरील नागरिकांच्या असुविधा लक्षात घेऊन घाटाची उंची, निवारा छत, प्रवेशद्वार कमान, पिण्याचे पाणी आदी सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत, तर दुसरीकडे तुटलेल्या चेंबरकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यात याच भागातील एका खड्ड्यात तीन म्हशी पडल्या होत्या. त्यापैकी दोन म्हशी दगावल्या; तर प्राणीमित्र व नागरिकांनी एका म्हशीला वाचवले. चेंबरला मोठे भगदाड पडल्याने भटक्‍या जनावरांनाही धोका संभवतो. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील प्रभाग क्रमांक 31 व 32 या दोन्हींसाठी एकच अभियंता आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. 
- विलास सकट, स्थानिक रहिवासी 

अतिरिक्त प्रेशरमुळे चेंबर तुटतात. येथील पाहणी करून दोन-तीन दिवसांत दुरुस्तीचे काम करण्यात येईल. 
- प्रीती यादव, कनिष्ठ अभियंता, जुनी सांगवी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chamber breaks on ahalyadevi holkar ghat at old sangavi