पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

- पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी 
- मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून कौतुक
- मृत्युदर फक्त 1.42 टक्के 

पिंपरी : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने सर्वात कमी म्हणजे अवघा 1.42 टक्के राहिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय प्रशासनाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कौतुक केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत एकूण रुग्णसंख्या तीन हजार 708 झाली होती. विशेषतः दाट लोकवस्तीत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. जूनमध्ये रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदर सर्वाधिक राहिला आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत मृत्यूदर सर्वात कमी आहे. 31 मेपर्यंत केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात 39 जणांचा बळी गेला. जुलै महिन्याचा तिसरा दिवस आहे. काल एकाचा मृत्यू झाला. आज (ता. 3) दुपारी एकपर्यंत पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 53 झाली आहे. 

असे केले कौतुक 

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोविड रुग्णालयांची माहिती घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात वायसीएम रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य शहरांचा मृत्यूदर सहा ते आठ टक्के आल्याचेही त्यांनी नमूद केले. कमी मृत्यू ही खरोखरंच खूप समाधानकारक गोष्ट आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. 

डॉक्‍टरांची भावना 

एका रुग्णाचा मृत्यूसुद्धा दु:खदायक असतो. वायसीएममध्ये शुक्रवारपर्यंत (ता. 3) पिंपरी-चिंचवड शहरातील शहरातील 53 आणि शहराबाहेरील 32 अशा 85 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा उद्रेक होत असताना मृत्यूदराचा आकडा खूप कमी आहे. मार्चमध्ये बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ते वुहान (चीन) व दुबई येथून आलेले होते. यामुळे सर्व नागरिक घाबरून गेले. मात्र बाराही रुग्ण ठणठणीत बरे करून घरी पाठवले. त्यानंतर नागरिकांच्या चुकांमुळे संख्या वाढत गेली. तरीसुद्धा मरणाच्या दाढेतून रुग्ण बाहेर काढले आहेत. जिवंत राहण्याची काहीच शाश्‍वती नसलेले रुग्ण चालत घरी गेलेले आहेत. गेल्या चार महिन्यांच्या प्रयत्नाने आम्ही अजूनही नियंत्रण ठेवून आहोत, ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. यापुढेही सातत्य राखू आणि कोरोनाला हरवू. 

रुग्णाच्या आनंदासाठी... 

कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला. त्यापूर्वीच सर्व डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबॉय यांना प्रशिक्षण दिले होते. रिस्क माहिती असूनही सर्व जण स्वतःला झोकून सेवा देत आहेत. प्रकृती गंभीर असलेला रुग्ण बरा होऊन घरी जातो. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. त्या आनंदासाठीच आम्ही काम करतोय, अशी भावना वायसीएमच्या अतिदक्षता विभागातील डॉक्‍टरांनी व्यक्त केली. 

अशी आहे व्यवस्था 

वायसीएममध्ये सध्या अतिदक्षता विभागाचे दोन कक्ष आहेत. 33 बेडची व्यवस्था तिथे आहे. रुग्णालयातीलच रुबी अलकेअरचे 20 बेड राखीव ठेवले आहेत. शिवाय, आयसीयूतून बाहेर आलेल्या रुग्णांसाठी 40 बेडची सुविधा आहे. आणखी 30 बेडचा आयसीयू कक्ष सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. त्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे. 

मृत्यूची कारणे 

 • प्रतिकार शक्ती कमी असलेले 
 • फुफ्फूस, हृदयविकार, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार 
 • प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही तास अगोदर रुग्णालयात दाखल 

असे झाले मृत्यू 

 • महिना/वायसीएम/खासगी रुग्णालय 
 • मार्च/0/0 
 • एप्रिल/2/1 
 • मे/3/2 
 • जून/23/16 
 • जुलै/5/1 

शुक्रवारी दुपारी एकपर्यंत 

 • वर्णन/शहरातील/शहराबाहेरील 
 • एकूण पॉझिटीव्ह/3708/283 
 • बरे झालेले/2189/197 
 • उपचार सुरू/1466/86 
 • एकूण मृत्यू/53/32 

मृत्यूची टक्केवारी 

 • शहरातील : 1.42 
 • शहराबाहेरील : 11.30 
 • उपचार घेऊन : 5 
 • अन्य आजार व संसर्ग : 95 

शहरनिहाय मृत्यूदर तुलना 

 • शहर टक्केवारी 
 • मुंबई 5.81 
 • नवी मुंबई 2.13 
 • ठाणे 3.39 
 • पुणे 3.52 
 • औरंगाबाद 11.11 
 • सोलापूर 10.68 
 • नाशिक 3.57 
 • मालेगाव 7.33 
 • पिंपरी-चिंचवड 1.42 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारचे आदेश व वेळोवेळी मिळालेल्या सूचनांचे पालन करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अन्य रुग्णालयांच्या तुलनेत वायसीएमची रचना सुटसुटीत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळता येत आहे. तपासणीसाठी आलेले संशयितांसह पॉझिटीव्ह रुग्णांमध्येही सुरक्षित अंतर ठेवता येत असल्याने क्रॉस इन्फेक्‍शन होत नाही. 90 टक्के रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी गेले आहेत. त्यांना पुन्हा संसर्ग होऊ नये, याची काळजी घेतली. जेवण, औषधे वेळेच्या वेळी देऊन व्यवस्थित मॉनेटरिंग केले जात आहे. 

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम हॉस्पिटल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray said about the Corona situation in Pimpri-Chinchwad