असे संपवले सातवर्षीय बालकाला; दोन आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Ogale

पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथून सात वर्षीय मुलाचे गुरुवारी (ता. ८) अपहरण केले. गळा व नाक-तोंड दाबून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

असे संपवले सातवर्षीय बालकाला; दोन आरोपी अटकेत

पिंपरी - पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथून सात वर्षीय मुलाचे गुरुवारी (ता. ८) अपहरण केले. गळा व नाक-तोंड दाबून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वीस कोटींची खंडणी व कौटुंबिक वादातून शेजारीच राहणाऱ्या तरुणाने साथीदाराच्या मदतीने बालकाला संपविले. शनिवारी (ता. ९) मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड हादरले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आदित्य गजानन ओगले (वय ७, रा. बिल्डिंग बी/४, ग्रीनफिल्ड सोसायटी, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंथन किरण भोसले (वय २०, रा. बिल्डिंग बी/४, ग्रीनफिल्ड सोसायटी, मासुळकर कॉलनी, पिंपरी), अनिकेत श्रीकृष्ण समदर (वय २१, रा. साई कृपा हौसिंग सोसायटी, घरकुल , चिखली) यांना अटक केली आहे.

गुरुवार (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला आदित्य उशिरापर्यंत घरी परतला नाही. याबाबत बांधकाम व्यावसायिक असलेले त्याचे वडील गजानन ओगले यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, रात्री एकच्या सुमारास ओगले यांच्या व्हॅट्सॲपवर मेसेज करून वीस कोटींची खंडणीची मागणी केली. ‘दोन दिवसात पैसे तयार ठेव’, असे मेसेजमध्ये म्हटले होते. मेसेज करणारा व्यक्ती उत्तरप्रदेशचा असल्याचे भासवले. दरम्यान, व्हाट्सअप नंबरचा शोध घेतला असता तो उत्तरप्रदेश येथे रजिस्टर असल्याचे समोर आले. मात्र, मोबाईल नंबरधारक व्यक्ती चिखली येथे बिगारी काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सखोल तपास केला असता मोबाईल नंबरचा गैरवापर करून आरोपींनी ओगले यांना हा मेसेज केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने व्हॅट्सॲपवर मेसेज करताना मोबाईल बिगारी कामगाराचा वापरला परंतु; आईचा व्हाट्स्पॉट वापरल्याने तो पकडला गेला. तांत्रिक तपास करून पोलिसांनी मंथनला ताब्यात घेतले.

मंथन हा नेहमी सोसायटीतील सदस्यांना व त्यांच्या मुलांना त्रास देत होता. यावरून गजानन ओगले यांनी त्याला अनेकदा रागवले होते. त्यावरून त्यांच्यात कौटुंबिक वादही झाले होते. सोसायटीत याची चर्चा झाल्याने मंथनला राग होता. यावरून ओगले यांना धडा शिकविण्यासाठी व त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी मंथनने त्याचा साथीदार अनिकेत याच्यासह हा कट रचला.

काही क्षणाची चुकामुक

खून केल्यानंतर आरोपींनी ज्याठिकाणी मृतदेह ठेवला. त्या पडीक जागेत व्यसनी लोक येत असतात. वादाचे प्रसंगही घडत असल्याने पोलिस कधीतरी तेथे पाहणीसाठी जातात. गुरुवारीही गस्तीवरील पोलिस तेथे आले होते. त्यावेळी आरोपी मोटारीतील मृतदेह तेथील इमारतीच्या टेरेसवर ठेवून सिगारेट ओढत खाली येत होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सिगारेट पिण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोटारीची तपासणीही केली. मात्र, काही मिनिटे अगोदरच मोटारीतून मृतदेह नेला होता.

मंथनवर सोसायटीकडूनही कारवाई

मंथन सोसायटीतील नागरिकांना त्रास द्यायचा. कारवाई केली होती. सतत अंमली पदार्थांचे व्यसन करीत असल्याने कुटुंबीयांनी त्याला काही दिवस व्यसनमुक्ती केंद्रात ठेवल्याचेही पोलिसांनी सांगितले. नुकतेच त्याने कोंढव्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, अशी माहिती पोलीसांनी दिली.

तीन बहिणींमध्ये लाडका

आदित्य पिंपरीतील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याला तीन बहिणी असून त्यातील एक त्याच्या सोबतचीच जुळी बहीण आहे. तिन्ही बहिणीसह कुटुंबातही तो सर्वांचा लाडका होता.

गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार बिनधास्त पोलिसांसोबतच वावरला

आदित्यला मोटारीत बसवतानाचा त्याला संपवले. सोसायटीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पडीक इमारतीत त्याचा मृतदेह ठेवला. त्यानंतर आरोपी मंथन हा एक तासातच पुन्हा सोसायटीत आला. तोपर्यंत आदित्य गायब झाल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज व परिसरात चौकशी करून पोलिसांनी तपास सुरु केला. नागरिकही शोधाशोध करीत होते. त्यांच्याबरोबर मंथनही पोलिसांसोबत आदित्यचा शोध घेत होता. बराचवेळ त्याचा हा उद्योग सुरु होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत मंथनचेही नाव पुढे आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी असता त्याने कसलीही कबुली न देता आपण काहीच केले नसल्याचे ठामपणे सांगत होता. अशातच आदित्यच्या वडिलांना अज्ञात मोबाईल नंबरवरुन वीस कोटी खंडणीचा मेसेज आल्याने पोलिसांचा मंथनवरील संशय कमी झाला.

हॉटस्पॉट घेतले अन अडकला

मंथनने नियोजनबद्ध कट रचला होता. आपल्यावर संशय न येण्यासाठी त्याने नवीन मोबाईल खरेदी केला. चिखली येथे एका बिगाऱ्याला काहीही बहाना सांगून त्याचे व्हाट्सअप स्वतःच्या नवीन मोबाईलवर कनेक्ट करून घेतले. त्यानंतर आईच्या मोबाईलवरील हॉटस्पॉट कनेक्ट करून ओगले यांना खंडणीचा मेसेज केला. दरम्यान, सुरुवातीच्या चौकशीत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करणारा मंथन अखेर तांत्रिक तपासात पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनिकेत दिसत असल्याचे मन्थनला समजल्याने त्याने अनिकेतला केस व दाढी कमी करण्यास सांगितले.

पोलिसांची सीसीटीव्हीवरच मदार

आदित्यचे अपहरण झाल्याचा सर्व प्रसंग सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याआधारावर पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, आरोपींपर्यत पोहोचण्यासाठी पोलिसांना चोवीस तास लागले. यादरम्यान अपहृत निरागस बालकाचा जीवही गेला. सोसायटीत आणखी कॅमेरे असते आरोपीपर्यंत लवकर पोहोचलो असते. असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. सोसायटीलाही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत कळविले असल्याचे पोलिस म्हणतात. यावरून पोलिसांची मदार केवळ सीसीटीव्ही कमेऱ्यांवरच असल्याचे दिसून येते.

सीसीटिव्हीत आरोपी अनिकेत हा आदित्यला जबरदस्तीने नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, मोटार नजरेस पडत नाही. दरम्यान, लोकवस्तीत असलेल्या सोसायटीत वर्दळीच्या वेळी घटना घडल्याने खळबळ उडाली. शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, या मोठ्या सोसायटीत दोनच कॅमेरे आहेत. येथे कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत सोसायटीला महिनाभरापूर्वी सुचना दिल्याचे पोलिस सांगत आहेत. प्रवेशद्वारासह इतरही ठिकाणी कॅमेरे नाहीत. याबाबत सोसायटीने काळजी घायलाच हवी. मात्र, पोलिस प्रशासनानेही केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अवलंबून न राहता गस्त वाढविणे, खबऱ्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग करणे आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलिसांचा धाक गेला कुठे?

शहरात पाठोपाठ गंभीर गुन्हे घडत आहेत. खून, प्राणघातक हल्ला, टोळ्याचा राडा असे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशातच आदित्यच्या खून प्रकरणानंतर खळबळ उडाली असून सध्या शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की, नाही असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असली अशा घेत रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सहा महिन्यातील दुसरी घटना

खंडणीसाठी अपहरण करून लहान मुलांचा खून केल्याची सहा महिन्यांतील शहरातील ही दुसरी घटना आहे. चिखलीतील लक्ष्मण उर्फ लखन बाबूलाल देवासी (वय ८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) या बालकाचा एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून खून केला. या प्रकरणात बपीलअहमद रईस लष्कर (वय २६, रा. गणेश मंदिराजवळ, हरगुडे वस्ती, कुडळवाडी, चिखली, मूळ-आसाम) याला पोलिसांनी अटक केली. घरापासून काही अंतरावरील एका पत्राशेडमध्ये सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून त्याला संपवले. दोन दिवसांनंतर यामधील आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Child Murder Pimpri Chinchwad Crime Accused Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..