
Chinchwad By Election : 'मविआ'चे उमेदवार नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी आज मंगळवारी(ता. ७) उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळेसौदागर येथून पदयात्रा काढत थेरगाव येथील “ग” क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, चिंचवडचे निरीक्षक व मावळचे आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यात स्पर्धा होती. दोघांनीही उमेदवारीसाठी जोर लावला होता. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली.
उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सकाळी ११ वाजता पिंपळेसौदागर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. रहाटणीमार्गे पदयात्रा थेरगावातील “ग” क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे काटे यांच्यात लढत होईल. तर, अपक्ष राहुल कलाटे यांचा अर्ज कायम राहिल्यास लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.