Chinchwad Bypoll Election : चिंचवड मतदारसंघांत दुपारी तीन वाजेपर्यंत ३०.५५ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad Bypoll Election

Chinchwad Bypoll Election : चिंचवड मतदारसंघांत दुपारी तीन वाजेपर्यंत ३०.५५ टक्के मतदान

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे.

सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.५५ टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यासाठी अवघे तीन तास बाकी आहे. भर दुपारी उन्हाचा चटका वाढलेला असूनही बहुतांश केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवले जात आहे.

या कक्षाला निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही मतदान केंद्रांना देखील ते भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहे.

255 मतदान केंद्रावर वेबकास्टींग

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.

सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त असून स्थानिक पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, रेल्वे पोलिस दल व इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसही तैनात आहेत. मतदान केंद्र परिसरात केवळ मतदारांनाच प्रवेश दिला जात आहे.

संवेदनशील केंद्रावर अधिक बंदोबस्त आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर विशेष सहायकासह व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. ते देखील मताधिकार बजावत आहेत. संदीप रामचंद्र माळी हा युवक दिव्यांग असून पहिल्यांदाच मताधिकार बजावत होता.

दिव्यांग असल्याकारणाने मतदान केंद्रात जाऊन मताधिकार बजावणे त्यास शक्य होत नव्हते. त्याला निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले.

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील सखी मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच रावेत येथील भोंडवे शाळेत तयार करण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रात देखील भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.