चिंचवडमध्ये ३३ उमेदवारांचे अर्ज वैध; ७ उमेदवारांचे अर्ज अवैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Dhole

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते.

Chinchwad Vidhansabha Byelection : चिंचवडमध्ये ३३ उमेदवारांचे अर्ज वैध; ७ उमेदवारांचे अर्ज अवैध

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ७ उमेदवारांचे अर्ज अवैध आज बुधवारी (ता. ८) ठरले आहे. तर; ५३ अर्जांपैकी ४० अर्ज वैध ठरले असून १३ अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज अवैध ठरलेल्या ७ उमेदवारांमध्ये आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांचाही समावेश आहे. तर; भाजपाचे उमेदवार अश्‍विनी जगताप यांचा अर्ज वैध असल्याने बदली (डमी) उमेदवार शंकर जगताप यांचेही ४ अर्ज अवैध ठरले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची आज बुधवारी (ता. ८) छाननी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या उमेदवारांची घोषणा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणुक पोलीस निरीक्षक अनिल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये अपक्ष चेतन ढोरे, गणेश जोशी, उमेश म्हेत्रे, प्रकाश बालवडकर, संजय मागाडे, भाजपाचे बदली उमेदवार शंकर जगताप, आपचे उमेदवार मनोहर पाटील यांचा समावेश आहे. तर; अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये भाजपाच्या अश्‍विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, बहुजन मुक्ती पार्टीचे सतिश कांबिये, बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ल मोतिलिंग, आजाद समाज पार्टीचे (कांशीराम) मनोज खंडागळे आदि ३३ जणांचा समावेश आहे.

एकूण उमेदवार - ४०

वैध उमेदवार - ३३

अवैध उमेदवार - ७

एकूण उमेदवारी अर्ज - ५३

वैध उमेदवारी अर्ज - ४०

अवैध उमेदवारी अर्ज - १३

३३ उमेदवारांपैकी राष्ट्रीयकृत पक्षांचे उमेदवार - २

नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार - ५

अपक्ष उमेदवार - २६