प्रचारामुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rickshaw

गेल्या काही वर्षांपासून रिक्षा व्यवसायावर संक्रांत आली आहे. कोरोनामुळे देखील या व्यावसायिकांचे हाल झाले. त्यात ओला, उबेर आणि रॅपिडोने व्यवसायाचे तीन तेरा केले.

Chinchwad Vidhansabha Byelection : प्रचारामुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण

पिंपरी - गेल्या काही वर्षांपासून रिक्षा व्यवसायावर संक्रांत आली आहे. कोरोनामुळे देखील या व्यावसायिकांचे हाल झाले. त्यात ओला, उबेर आणि रॅपिडोने व्यवसायाचे तीन तेरा केले. त्यानंतर, रिक्षाच्या भाडेशुल्कात काही अंशी वाढ झाल्याने व्यावसायिकांना धीर आला. तरीही, दिवसाला सहाशे ते सातशे रुपयांच्यावर रिक्षाची कमाई होत नाही. घरखर्च वजा करून संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत आशेचा किरण म्हणजे, चिंचवड पोटनिवडणूक लागली. परिणामी, रिक्षाचालकांच्या चाकांना प्रचारामुळे वेग आला असून, दिवसभराची चांगली कमाई होत असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात लाखाच्या घरात रिक्षा व्यावसायिक आहेत. कोरोनानंतर हा आकडा हजारोमध्ये येऊन ठेपला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आदेश आल्यानंतर तत्काळ रिक्षा चालकांच्या हाताला काम लागले. सुमारे ७० ते ८० रिक्षा व्यावसायिक दैनंदिन सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. रिक्षाला बॅनर आणि फ्लेक्स लावून त्यांचा प्रचार सुरु आहे. चिंचवड पोटनिवडणुकीला टक्कर देण्यासाठी सर्वच उमेदवारांनी कसून प्रयत्न सुरु केला आहे. त्यात रिक्षाचालकांच्या प्रचाराचा वाटा मोलाचा ठरत आहे.

सकाळी ९ वाजता गरमागरम नाष्टा आणि चहा रिक्षाचालकांना मिळतो. त्यानंतर, दुपारी एक वाजता अर्ध्या तासाची विश्रांती घेतल्यानंतर उमेदवारांच्या कार्यालयात जेवणाची सोय होते. त्या ठिकाणी देखील गरमागरम जेवण. त्यानंतर, रात्रीचे जेवणदेखील छान मिळते. या पोटनिवडणुकीत रिक्षा व्यावसायिकांना चांगलीच मेजवानी मिळाली असून, हाताला काम मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक नियमानुसार गरज आहेत, तेवढ्याच रिक्षा व्यावसायिकांची नेमणूक प्रचारासाठी करण्यात आली आहे.

आधीच रॅपिडोमुळे व्यवसाय कोलमडला होता. निवडणुकीमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायाला पाठबळ मिळाले आहे. भाडेवाढ होऊन देखील पूर्वीप्रमाणे प्रवाशांना सध्या पैसे मोजायला परवडत नाही. रिक्षाकरिता प्रत्येक दीड किलोमीटरला शुल्क २५ रुपये आहे. आणि त्यापुढील किलोमीटरला शुल्क १७ रुपये आहे. अनेक प्रवासी जुन्या दराप्रमाणे पैसे घ्या, अशी विनंती करतात. पिंपरी-चिंचवड शहराला आता रिक्षा मीटर सुरु करणे आवश्यक आहे.

- संतोष उबाळे, रिक्षा व्यावसायिक

चिंचवड, रावेत, सांगवी, वाकड, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी गावात रोज प्रचाराचे काम सुरु आहे. दुपारचे जेवण होते. त्यानंतर, रात्री आठपर्यंत काम संपते. सीएनजी स्वत: भरतो. पण, दीड हजार रुपये जेवण करून मिळत असल्याने परवडते. दोन स्पीकर, बॅनर आणि झेंडे रिक्षामध्ये आहेत. कॅसेट दिवसभर सुरु असते. आम्हाला केवळ फिरावे लागते.

- संतोष भोसले, रिक्षा व्यावसायिक