...म्हणून मोशी टोल नाका अन्यत्र हलवा

...म्हणून मोशी टोल नाका अन्यत्र हलवा

मोशी : आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोशीतील इंद्रायणी घाटावर जाणे, शेतीच्या कामासासह अन्य दैनंदिन कामांसाठी टोलनाक्याच्या पलिकडे वारंवार ये-जा करणे आदी कामांसाठी स्थानिक नागरिकांना वाहनांमधून ये-जा करावी लागते. यावेळी काही वेळा स्थानिक नागरिक आहे, असे सांगूनही येथील कर्मचारी टोल देण्यासाठी आग्रह धरतात. तसेच, मोशीतील टोलनाक्यावर सतत लागलेल्या वाहनांच्या रांगा व झालेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील टोल नाका अन्यत्र हलविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

सरकारच्या मोशी येथे आयआरबी या कंपनीच्यावतीने 15 डिसेंबर 2005 मध्ये मोशीतील टोल नाका सुरू करण्यात आला. सध्या या टोल नाक्याची मुदत 14 सप्टेंबर 2021 पर्यंतची आहे. सरकारने सध्या लाॅकडाउन शिथील केला आहे. त्यामुळे विविध कारणांसाठी अनेक नागरिक मोठ्या संख्येने पुणे नाशिक महामार्गाने प्रवास करत आहेत. चाकण, खेड औद्योगिक परिसराकडे ये-जा करणार्‍या वाहनचालकांची त्यात मोठी संख्या आहे. त्यामुळे येथे टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत आहे. त्यातच एम एच 14 सोडून एम एच 12 आणि एम एच 15, 16, 17 आदी पासिंग असलेल्या जिल्ह्यातील वाहने याठिकाणी टोल भरण्यासाठी थांबली असता या वाहनांच्या पुढे एम एच 14 पासिंग असलेल्या वाहनास येथील कर्मचारी टोलमधून सुटका देतात. हे पाहिल्यावर एम एच 15 आदी पासिंग असलेले वाहन चालक या ठिकाणी टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. 

एम एच 14 पासिंग असलेल्या गाड्यांना आपण का सूट देता? त्यांना सूट देण्यामागे आपल्याकडे काय कारण आहे? त्यांना देता मग आम्हाला का देत नाहीत? अशाप्रकारे या ठिकाणी वाहनचालक पाच पाच दहा मिनिट हुज्जत घालत बसतात.त्यामुळे मागे अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. परिणामी वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरिकांना येथे मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच स्थानिक नागरिकांना टोल  भरण्यापासून सवलत दिली असल्याचा समज येथील नागरिकांचा असल्याने  किंवा तशी भूमीका घेत काही अन्य वाहनचालक या ठिकाणी टोल भरण्यापासून मुक्ती मिळावी, यासाठी  हुज्जत घालत असतात. त्यामुळेही वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात त्यातच सोमवार ते शनिवार कार्यालयीन दिवस असल्याने भोसरी, चाकण, खेड जुन्नर आदी भागांत कार्यालयीन कामकाजासाठी ये जा करणारे वाहनचालकही सध्या मोठ्या प्रमाणावर टोल नाक्यावर रांगा लागायला सुरुवात केल्याचे दिसून येते आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे-नाशिक महामार्गावरील कोणत्याही चौकामध्ये सध्या वाहतूक पोलिस नसल्याने काहीही काम नसताना उगीचच बाहेर पडलेल्या वाहनचालकांची भीती नष्ट झाली आहे. त्यामुळे  प्रत्येक चौकासह येथील टोलनाक्यावरही वाहनचालक गर्दी करत आहेत. त्यातच मोशीतील टोलनाक्यावरही जुन्नर, खेड, आंबेगाव आदी ग्रामीण भागातून शहराकडे तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण औद्योगिक परिसराकडे जाणार्‍या मोठ्या प्रमाणावरील वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत आहे. पोलिसांनी सध्या ग्रामीण भागाकडून तसेच दुसर्‍या जिल्ह्यातून येणाऱ्या वाहन चालकांच्या तपासणीत शिथिलता आणली आहे. पोलीसांऐवजी सध्या येथे असलेले दोन ट्रॅफीक वाॅर्डनही या वाहनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान,  येथील टोल नाका कायमस्वरूपी बंद करावा किंवा अन्यत्र हलवावा, अशी मागणी मोशी व चिखली परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत टोल नाक्याचे व्यवस्थापक पी. एम. पणशीकर म्हणाले, "स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारे सवलत नाही. मात्र, टोल भरण्यापासून मुक्ती मिळावी, यासाठी काही स्थानिक नागरिक रहिवासी पुरावा न दाखवता हुज्जत घालतात. त्याला आळा बसावा आणि त्यामध्ये वेळ वाया जाऊ नये. तसेच फासस्टॅगधारक वाहनचालकांना त्रास होऊ नये, यासाठी सौजन्य म्हणून स्थानिक नागरिकांना पुरावा पाहूनच त्यांना काही प्रमाणात सवलत दिली जाते. मात्र, असा कोणताही नियम नाही की स्थानिकांना सवलत आणि इतरांना टोल अशी कोणतीही भावना नाही.

सध्या खरोखरच टोल नाक्यावर मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. खरे पाहता या टोल नाक्याची मुदत केव्हाच संपलेली आहे. मात्र त्यांनी पुढेही चालविण्याची मुदत वाढवून घेतली आहे. असे असले तरी स्थानिक नागरीकांना होत असलेल्या त्रास बंद व्हावा, यासाठी हा टोल नाका येथून हलविण्यात यावा किंवा बंदच करण्यात यावा. अन्यथा स्थानिक नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल.

- धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com