Lakshman Jagtap : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांकडून आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज दिवसभरासाठी बंद
Laxman Jagtap
Laxman JagtapEsakal

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे.

तडफदार नेतृत्व काळाने हिरावले : मुख्यमंत्री

"नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत.

लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे.

जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

पक्षासाठी अत्यंत दुःखद घटना : उपमुख्यमंत्री फडणवीस “लक्ष्मण जगताप हे एका आजाराशी लढत होते. मात्र आज त्यांचं निधन झालं आहे. ही आमच्या पक्षासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची आजाराशी झुंज सुरू होती.

ते यातून बाहेर येतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. मी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांना आदरांजली वाहिली.

पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा वस्तुपाठ : पालकमंत्री पाटील

“पिंपरी-चिंचवडमधून तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचं निधन खूपच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तुपाठ होते. बरे होतील असं वाटतानाच त्यांचं असं जाणं चटका लावणारं आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासोबत आहोत,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

महापालिकेचे कामकाज बंद

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज मंगळवारी बंद ठेवण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कळविले आहे.

जगताप हे १९९२ पासून शहराच्या राजकारणात सक्रीय आहेत. तीन वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी पदे त्यांनी भुषविली आहेत. एक वेळ विधान परिषद सदस्य, तीन वेळा विधानसभा सदस्य अशी त्यांची कारकीर्द आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com