आता सीएनजी दरवाढीची चालकांना धास्ती | CNG Rate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG
आता सीएनजी दरवाढीची चालकांना धास्ती

आता सीएनजी दरवाढीची चालकांना धास्ती

पिंपरी - पेट्रोल आणि डिझेल दराचा भडका उडाल्यानंतर काही अंशी सीएनजीवर (काँप्रेस्ड नॅचरल गॅस) मोटार चालकांची भिस्त होती. जुलै महिन्यात ५४.८० रुपये असणारा सीएनजी पाहता-पाहता ऑक्टोबरमध्ये ६३ रुपये ९० पैशांवर पोहोचला आहे. त्यामुळे, आता हा दर पेट्रोल-डिझेल प्रमाणेच वाढत राहील की काय? अशी धाकधूक वाहनचालकांना वाटू लागली आहे. सतत लांबचा प्रवास करणाऱ्या वाहनांना सीएनजी कीट बसविण्यासाठी ५० ते ५५ हजार रुपये खर्च करणारे वाहनचालक पेट्रोलियम पदार्थ दरवाढीमुळे पेचात पडले आहेत.

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहने सीएनजीवर करून घेण्यासाठी वाहनधारकांचा अधिक कल आहे. सध्या शहरात हे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. तर, पेट्रोलवरील वाहने परवडत नसल्याने अनेकांनी वापर कमी केला आहे. शेअरिंग प्रवास पद्धतही रूढ होवू लागली आहे. कारण, पेट्रोल-डिझेलवर दुपटीहून अधिक होणारा खर्च सीएनजीमुळे वाचत आहे. लांबपल्ल्याच्या वाहनांना सर्वाधिक सीएनजीची गरज पडत आहे. त्यामध्ये, शाळांच्या बस, आयटी कंपन्यांच्या प्रवासी वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. तसेच टुर्स ॲंड ट्रॅव्हल्सच्या वाहनांनी देखील याचा अवलंब केला आहे. त्याचबरोबर शहरातील रिक्षा, खासगी वाहतूक ही सर्वाधिक मोठ्या प्रमाणात सीएनजीवर सुरु आहे.

हेही वाचा: Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ नवीन रुग्ण

शहरात सध्या निगडी, काळेवाडी, चिंचवड, दापोडी, लोणावळा, तळेगाव, चाकण, पिंपरी या ठिकाणी सीएनजीचे ११ पंप आहेत. सीएनजी कीट बसवून देणारे शंभरहून अधिक खासगी विक्रेते आहेत. सध्या असे कीट बसविण्यासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. टाटा व मारुतीच्या वाहनांना सर्वाधिक किटची मागणी वाढली आहे. खासकरून पेट्रोलवरील वाहनांना कीट बसवून घेतले जात आहे. ॲव्हरेजही चांगले मिळत असल्याने नागरिकांचा कल अधिक प्रमाणात सीएनजीकडे वाढला आहे. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील सीएनजीची जास्त जोखीम नाही. शिवाय या वाहनांमधून प्रदूषण कमी प्रमाणात होत आहे.

ही घ्या काळजी

 • तीन वर्षांतून एकदा कीटचे नूतनीकरण

 • आगीच्या ठिकाणी वाहनाचा संपर्क नको

 • कीटसाठी आरटीओची पूर्वपरवानगी

 • मान्यताप्राप्त रेट्रोफिटरकडूनच कीट घ्या

 • सरासरी एका पंपावर दैनंदिन ४ हजार लिटर सीएनजीची विक्री

 • टाकी तपासणी : ९०० रुपये

 • साधे कीट : ३५ ते ४० हजार रुपये

 • चांगल्या दर्जाचे कीट : ५० ते ६० हजार रुपये

 • इंधन बदल आरटीओ शुल्क : ३०० रुपये

 • सीएनजी फिटींग : १५०० ते २००० रुपये

 • सीएनजी पंपचालक : १० ते १२

अनेकजण आता उच्चभ्रू पसंतीच्या वाहनांनाही सीएनजी कीट बसू लागले आहेत. कीट बसविण्याचे अनेक फायदे आहेत. वाहनांना पिकअप चांगला मिळत आहे. इतर पेट्रोलियम पदार्थांच्यामागे सीएनजीमधून ५० टक़्के बचत होत आहे.

- हुसैन शेख, रावेत, सीएनजी कीट विक्रेता

कोरोना काळामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अनेकदा पंपावर लोक दरवाढीबद्दल चिंता व्यक्त करतात. सीएनजीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणे गरजेचे आहे. अन्यथा व्यावसायिकांचे हाल होणार आहेत. अनेकजण नियमित प्रवासासाठी सीएनजीला प्राधान्य देऊ लागले आहेत.

- विशाल पिंपळे, सीएनजी पंप मालक, चिंचवड

loading image
go to top