रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर आता फौजदारी; पिंपरी महापालिका आयुक्त काय म्हणाले पाहा

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी नागरिकांशी 'फेसबुक लाइव्ह'द्वारे संवाद साधला.

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. मात्र, लक्षणे नसलेल्यांचे प्रमाण 80 टक्के आहे. अशा रुग्णांना त्यांच्या घरामध्येच विलगीकरण अर्थात होम आयसोलेशन अधिक सुरक्षित आहे. ज्यांच्या घरी टॉयलेट, बाथरूमसह स्वतंत्र खोलीची सोय आहे. अशांना घरामध्येच आयसोलेशन करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्याशी डॉक्‍टर वेळोवेळी संपर्कात राहतील किंवा रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्‍टरांशी संपर्क साधू शकतील, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सार्वजनिक थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. अशा व्यक्तींवर प्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल. मास्क न वापरल्यास प्रारंभी पाचशे रुपये दंड आकारला जाईल. तीच व्यक्ती पुन्हा आढळल्यास हजार रुपये दंड आकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी नागरिकांशी 'फेसबुक लाइव्ह'द्वारे संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. आयुक्त म्हणाले, "शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत. 20 टक्के रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आहेत. सध्या 30 जण व्हेंटिलेटरवर आहेत. झोपडपट्टी, दाट लोकवस्तीत सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांनी बंधने पाळावीत. मास्क वापरावेत. सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास काळजी घ्यावी. डॉक्‍टरांना दाखवा. जीवनसत्वयुक्त आहार घ्यावा. आपल्या आजूबाजूला रूग्ण आढळल्यास घाबरून जाऊ नका. भीती बाळगू नका.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी महापालिका ऍप व ज्येष्ठ नागरिक संघांची मदत घेतली जात आहे. दाट लोकवस्तीत सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या 12 हॉटस्पॉट आहेत. अधिक प्रसार होऊ नये, यासाठी तपासणीचे प्रमाण वाढविलेले आहे. त्यासाठी खासगी लॅबची मदत घेतली आहे. नागरिकांनी पीसीएमसी स्मार्ट सिटी ऍप डाऊनलोड करून घ्यावे. त्याद्वारे माहिती दिल्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टर संबंधितांशी संपर्क साधू शकतील. म्हणजेच, कोरोनाची लक्षणे आढळल्यास वेळीच निदान करणे सोपे हाईल.'' 

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

ज्या रुग्णांच्या घरी स्वतंत्र खोलीची सोय आहे. त्यांना घरामध्येच आयसोलेशन करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्याशी डॉक्‍टर वेळोवेळी संपर्कात राहतील किंवा रुग्ण व त्यांच्या नातेवाईक डॉक्‍टरांशी संपर्क साधू शकतील. खासगी रुग्णालये व हॉटेलमध्येसुद्धा आयसोलेशन होण्याची सुविधा उपलब्ध असेल. त्याबाबतचे दर निश्‍चित केले जातील. घरामध्ये आयसोलेशनचा कालावधी सतरा दिवसांचा असेल. तसेच, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे. किमान पूर्णतः घरातच थांबायला हवे. यामुळे नवीन रूग्ण वाढणार नाहीत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण स्वतःची काळजी घेतल्यास स्वतःसह घर व शहर सुरक्षित राहील, हे शहरातील प्रत्येक नागरिकावर अवलंबून आहे. सध्या मृत्यूदर कमी करण्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, मास्क न घालणाऱ्यांवर आरोग्य विभागामार्फत कारवाई सुरू आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner Shravan Hardikar interacted with the citizens through facebook live