esakal | महानगरपालिका खासगी रुग्णालयांवर ठेवणार ‘वॉच’; आयुक्त राजेश पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

महानगरपालिका खासगी रुग्णालयांवर ठेवणार ‘वॉच’; आयुक्त राजेश पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - काही खासगी रुग्णालयांमध्ये (Private Hospital) रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) अनावश्यक वापर होत आहे. रुग्णांच्या (Patient) नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगितले जात असल्याने काळाबाजार (Blackmarket) होत आहे. अधिक शुल्क आकारून बेड (Bed) दिले जात आहेत. अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले असून, दोषींविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली. (Corporation will Keep a Watch on Private Hospitals Rajesh Patil)

कोरोना संक्रमण रोखणे व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने शहरातील १३५ खासगी हॉस्पिटलच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत. त्यांनाही रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र, काही रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णालयांतील रुग्णसेवा, त्यासाठीचे शुल्क, बेड व उपलब्धता, रुग्णांचा डिस्चार्ज अहवाल व इतर प्रशासकीय कामकाजासाठी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या मदतीसाठी रुग्णालयनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णालयांनी नमूद केल्याप्रमाणे सोयी-सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा नाही याबाबींची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकतेनुसार चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल.

हेही वाचा: पिंपरी : रुग्णालये व दवाखान्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणार भत्ता

आयुक्तांनी नोंदवलेले आक्षेप

  • रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा अनावश्यक वापर वाढला आहे. त्यामुळे सरकारकडून होणारा इंजेक्शनचा मर्यादित पुरवठा व साठा आणि मोठ्या प्रमाणावर होणारा अनावश्यक वापर यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. तातडीने इंजेक्शनची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मिळत नाही. यासाठी रुग्णांचे नातेवाईक, नगरसेवक, पदाधिकारी व इतरांचा सातत्याने पाठपुरावा व मागणी वाढत आहे.

  • बाजारात कुठेही थेट पद्धतीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या विक्रीस मनाई असताना अनेक खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन देण्यात येते. त्यामुळे इंजेक्सनचा काळाबाजार करणाऱ्यांना संधी प्राप्त होत आहे. यामुळे बनावट प्राप्त होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

  • रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध करून देतानाही हेतुपुरस्सर रुग्णालयांकडून बेड उपलब्ध नसल्याचे प्रथमतः: सांगण्यात येते. तद्नंतर अधिकचे शुल्क आकारून अथवा विशिष्ट व्यक्तींनाच बेड उपलब्ध करून देण्याचे प्रकार निदर्शनास आलेले आहेत. याबाबत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

  • कोरोनामुळे निधन झालेल्या रुग्णांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने स्मशानभूमी निश्‍चित केलेल्या आहेत. त्यासाठी आवश्यक साहित्य महापालिकेमार्फत मोफत पुरविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

आयुक्तांचा आदेश

  • रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा गरज असलेल्या रुग्णांसाठीच वापर होत आहे काय? त्याचा अनावश्यक वापर होत नाही ना? याची पडताळणी करण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली जाणार.

  • इंजेक्शनचा अनियंत्रित वापर करणाऱ्या रुग्णालयांवर नियमानुसार कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती. त्यांनी कामकाजाचा दैनंदिन अहवाल वैद्यकीय विभागाच्या मुख्य कार्यालयास सादर करावा

  • कोरोनामुळे निधन झालेल्या रुग्णांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असे फलक स्मशानभूमींच्या दर्शनी भागावर लावावेत. त्यावर क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेऊन गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई करावी