
हप्त्यासाठी टोळक्याने कोयता नाचवत माजवली दहशत
पिंपरी : 'आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला कोणी हप्ता दिला नाही तर, आम्ही त्यांना कापून टाकून खल्लास करू', अशी धमकी देत टोळक्याने कोयता नाचवत दहशत माजवली. हप्त्याची मागणी करीत दुकानदाराला मारहाण करून गल्ल्यातील रोकड लुटली. हा प्रकार थेरगाव येथील जगतापनगर येथे घडला.सौरभ चौधरी (वय २०, रा. जगतापनगर, थेरगाव), स्वप्नील संजय येडते (वय २२, रा. रहाटणी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर, त्यांचे साथीदार आतिश शिरसाठ, अमोल खंडागळे यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून ते पसार आहेत.
याप्रकरणी दुर्गाराम वेणाराम मेघवाल (रा. जगतापनगर, थेरगाव, मूळ-राजस्थान) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांच्या बॉबीच्या कारखान्यात आरडाओरडा करीत आले. आरोपी सौरभ हा 'तु आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले भाई आहोत. तुला दर महिन्याला आम्हाला दोन हजार रुपये हप्ता द्यावे लागेल', असे म्हणाला. त्यावर मी खुप गरीब आहे. मला जमणार नाही, असे फिर्यादी म्हणाले असता चिडलेल्या आतिश याने हातोडीने मेघवाल यांच्या दुचाकीची हेडलाईट फोडली. तर, सौरभ याने फिर्यादी यांच्या पायावर विट मारली. आरोपी स्वप्नीलने फिर्यादीची कॉलर पकडून त्यांच्याकडील दोन हजार रुपये काढून घेतले.
दरम्यान, सौरभ याने बाबुलाल देवासी यांच्या गल्ल्यातून ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेत २ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. तसेच आरोपींनी रमा संतोष कांबळे यांच्या चायनिजच्या स्टॉलवर जाऊन दर महिन्याला २ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. त्यांच्या गल्यातील १ हजार रुपये काढून घेत चायनिज गाडा उलटून नुकसान केले. तसेच हॉटेल वेलकम येथे तोडफोड करुन २ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. हॉटेल बाहेर असलेल्या पान स्टॉलवर जाऊनही २ हजार रुपये हप्त्याची मागणी करून गल्ल्यातून ३ हजार रुपये काढून घेतले. तेथून जात असताना 'आम्ही इथले भाई आहोत. जर आम्हाला कोणी हप्ता दिला नाही. तर, आम्ही त्यांना कापून टाकून खल्लास करू', असे म्हणत टोळक्याने कोयता नाचवत परिसरात दहशत माजवली.
Web Title: Crime News Pimpri Mob Collect Hafta From Shopkeeper Two Arrested By Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..