Crime News : पिंपरी-चिंचवडमधील दिवसभराचे क्राईम अपडेट्स 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

  1. एटीएम मशीन फोडून आठ लाखांची रोकड लंपास 
  2. उसने पैसे न दिल्याने तरूणावर वार; डोक्‍यात फोडल्या बिअरच्या बाटल्या 

एटीएम मशीन फोडून आठ लाखांची रोकड लंपास 

पिंपरी : आरबीएल बॅंकेचे एमटीएम मशीन गॅस कटरने फोडून चोरट्यांनी आठ लाखांची रोकड लंपास केली. ही घटना तळवडे येथे घडली. 

अजय लक्ष्मण कुरणे (रा. कळस, माळवाडी, आळंदी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. तळवडे रोडवरील हुमा बेकरीशेजारी आरबीएल बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी (ता.11) पहाटे सव्वा चारच्या सुमारास चोरटे एटीएम सेंटरमध्ये शिरले. एटीएम मशीन गॅस कटरने कापून, फोडून त्यातील 7 लाख 99 हजार 900 रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी एटीएम सेंटरमध्ये शिरताच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत मशीनचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यासह आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

उसने पैसे न दिल्याने तरूणावर वार; डोक्‍यात फोडल्या बिअरच्या बाटल्या 

पिंपरी : उसने पैसे न दिल्याच्या रागातून तरूणावर धारदार शस्त्राने वार करून डोक्‍यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. ही घटना वाकड येथील कावेरीनगर येथे घडली. 

मातादीन रजक (रा. पडवळनगर, थेरगाव) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बलवीर मुन्ना रजक (वय 25, रा. निगडी पुलाजवळ, मूळ-मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शनिवारी (ता.10) सकाळी अकराच्या सुमारास कावेरीनगर येथील रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या व गावाकडील आरोपीने त्यांच्याकडे उसने पैसे मागितले असता फिर्यादीने पैसे दिले नाही. यामुळे चिडलेल्या आरोपी मातादीन याने फिर्यादीच्या डोक्‍यात दोन बिअरच्या बाटल्या फोडल्या. तर त्याच्या साथीदाराने फिर्यादीवर धारदार हत्याराने वार केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime updates in pimpri chinchwad