Coronavirus: इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांबाबत दक्षता;महापालिकेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पिंपरी - ‘नवीन वर्षात नव्या उमेदीने कामाला लागू आणि कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडू,’ असे वातावरण असतानाच कोरोनाचा नवा अवतार इंग्लंडमध्ये दिसून आला आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला हा नवीन विषाणू स्टेन आहे. त्यामुळे इंग्लंडहून शहरात येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. मात्र, त्यापूर्वी शहरात दाखल झालेल्या ११५ जणांचा शोध प्रशासनाने घेतला. त्यातील १७ जण मिळू शकलेले नाहीत. उर्वरित ९८ जणांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा भीतीचे सावट पसरले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार, २४ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून शहरात आलेल्या व्यक्तींचा शोध महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. त्यातील पथकाने पाहणी केल्यानंतर ३५ वर्षीय तरुणात कोरोनाची लक्षणे आढळली. त्याच्या घशातील व नाकातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

एक जण मुंबईत
शहरातील एक तरुण बुधवारी (ता. २३) इंग्लंडहून मुंबईत आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मुंबईमधीलच एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाकडून त्याची काळजी घेतली जात आहे. आठ दिवसांनंतरही त्याच्यात काही लक्षणे न आढळल्यास त्याला घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, घरात चौदा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी शहरात आलेल्या ११५ जणांचा शोध घेतला जात आहे. त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भोसरी रुग्णालयात व्यवस्था
इंग्लंडहून आलेल्या व्यक्तींच्या क्वारंटाइनची व्यवस्था वाकड येथील सयाजी व जिंजर या दोन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. अशी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अशा रुग्णांसाठी नवीन भोसरी रुग्णालय राखीव ठेवण्यात आले आहे. येथील अगोदरचे अठरा रुग्ण नेहरूनगर येथील जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात दाखल केले आहेत, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले. हॉटेलमधील क्वारंटाइनचा खर्च संबंधित व्यक्तींकडून वसूल केला जाणार आहे. दरम्यान, २४ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून शहरात आलेल्या व्यक्तींचा शोधही महापालिका घेत आहे. त्यासाठी व पॉझिटिव्ह आढळलेल्यांवर उपचारासाठी स्वतंत्र डॉक्‍टर, नर्स व अन्य कर्मचारी नियुक्त केले असल्याचेही पवार यांनी सांगितले.  

दृष्टिक्षेपात प्रवासी
 इंग्लंडहून आलेले - ११५      शहरात असलेले - ९८
 शहराबाहेर गेलेले - १५      अपूर्ण पत्ते असलेले - २

दृष्टिक्षेपात रिपोर्ट 
 तपासणी केलेले - ९८   निगेटिव्ह रिपोर्ट - ८९
 पॉझिटिव्ह रिपोर्ट - १    प्रतीक्षेत रिपोर्ट - ८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision of Pimpri Chinchwad Municipal Corporation passengers from England