उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे घेतला मेट्रोच्या कामांचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट दिल्यामुळे महापालिका पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही खळबडून जागे झाले. काही पदाधिकारी फुगेवाडी व वल्लभनगर येथे पोहचेपर्यंत पवार बैठक उरकून परतले होते. 

पिंपरी : पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फुगेवाडी येथील मेट्रोच्या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामांचा आढावा पवार यांनी घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी पिंपरी ते पुणे महापालिका हद्द अर्थात दापोडी जवळील हॅरिस ब्रीज पर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याअंतर्गत फुगेवाडी व वल्लभनगर स्थानकाचे काम पुर्णत्वास आले आहे. कासारवाडी, नाशिक फाटा, खराळवाडी व पिंपरी स्थानकांची कामे सुरू आहेत. मेट्रो मार्गावर इलेक्ट्रीक केबल टाकण्याचे कामही सुरू आहे. या कामांची पाहणी करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या संपूर्ण कामाचा आढावा पवार यांनी घेतला. तत्पूर्वी मेट्रो अधिका-यांची फुगेवाडी कार्यालयात बैठकही घेतली.

हे वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचं आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट दिल्यामुळे महापालिका पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही खळबडून जागे झाले. काही पदाधिकारी फुगेवाडी व वल्लभनगर येथे पोहचेपर्यंत पवार बैठक उरकून परतले होते. पवार यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा सकाळी सकाळी येऊन विकास कामांचा आढावा घेतला आहे. त्यातीलच एक म्हणजे निगडी भक्तीशक्ती चौकातील उड्डाणपुलाची पहाणी. 

अजित पवार यांनी आज फुगेवाडी ते वल्लभनगर दरम्यान मेट्रोने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पवार यांनी प्रवास केलेला नसून दोन्ही स्थानकांना भेट देऊन पाहणी केली व अधिकारी दीक्षित यांच्याकडून कामाचा आढावा घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed ongoing construction work of Pune Metro earlier today