क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाऱ्यांची सतत धडपड; अजित पवारांनी टोचले पोलिसांचे कान 

क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाऱ्यांची सतत धडपड; अजित पवारांनी टोचले पोलिसांचे कान 

पिंपरी : "पोलिस दलात काही अधिकारी सतत क्रीम पोस्टिंगसाठी धडपडत असतात. कुणाचेही सरकार आले तरी ते मंत्रालयात संबंधित मंत्र्याच्या जवळ दिसतात. मुख्यमंत्री बदलतील, पण ते अधिकारी मुख्यमंत्र्यांजवळ जायचे सोडत नाही,'' असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे कान टोचले. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सेवा उपक्रम, एक्‍स ट्रॅकर उपक्रम आणि विविध सोशल मीडिया पेजेसचे लोकार्पण शुक्रवारी (ता. 5) झाले. तसेच, शहरातील पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे प्रमाणपत्र वाटप पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अण्णा बनसोडे, आमदार दिलीप मोहिते, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्‍त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवार म्हणाले, "विविध सेवांचे लोकार्पण केले. मात्र, यामध्ये सातत्य रहायला हवे. आपले काम लोकाभिमुख असायला हवे. राज्यातील काही ठिकाणी पोलिस ठाण्यांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे पिंपरी आयुक्तालयाचे अनुकरण राज्याच्या इतर भागांमध्ये कसे करता येईल, यासाठी नियोजन करू. कुठल्याही राजकीय पक्षाचा जर कोणी स्वतःच्या माध्यमातून गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्यास त्याच्यावरही वचक ठेवावा.'' ज्याप्रमाणे 108 रुग्णवाहिकेचा नंबर डायल केल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होते. त्याप्रमाणे पोलिसांकडून तत्काळ मदत मिळण्यासाठी एक नंबर उपलब्ध केला जाणार असून, काही क्षणात पोलिस मदतीचे वाहन तुमच्यापर्यंत दाखल होईल. हा उपक्रम राज्यात लवकरच सुरू होणार असून, यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातही विचार केला जाणार असल्याचे पवार यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वीच सर्व पोलिसांना स्मार्ट वॉच दिले आहेत. मात्र, ठराविक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याच हातात ते हे स्मार्ट वॉच दिसले. हे योग्य नाही. तुम्ही कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करत असताना नियमांचे पालन स्वतःपासूनच करायला हवे, असे सांगत पवारांनी पोलिसांचे कान टोचले. 

...अन्‌ सभागृहात हशा पिकला 
सध्या या उपक्रमांच्या माध्यमातून आयुक्तालयाने एक दमदार पाऊल टाकले आहे. मात्र, सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र असल्याने अचूक माहिती दिली गेली पाहिजे. काम करीत असताना एखादा अधिकारी चिडतो. मात्र, डोक्‍यावर बर्फ ठेवून काम करा. तापटपणा काढून टाका, हे अजित पवार तुम्हाला सांगतो याचा विचार करा, असे पवार यांनी नमूद करताच सभागृहात हशा पिकला. 

आणखी एक ठाणे वाढणार 
महापालिकेसाठी पोलिस ठाणे वाढवावे, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. महापालिका सर्वतोपरी आर्थिक पाठबळ करतील, असेही आयुक्तांनी सांगितले. नवीन ठाण्याबाबतच्या प्रशासनाला मी सूचना देईल. यासह चिखलीत महाराष्ट्रातील नंबर एकचे आयुक्तालय तयार करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

...ही अभिमानाची बाब 
काही दिवसांपूर्वी पोलिसांना सायकलचे वाटप केले. त्या सायकल परदेशातून निघाल्या असून जवळ आल्या आहेत. आठ, दहा दिवसांत येथे पोहोचतील. त्यानंतर आमचा पोलिस परदेशी सायकलवर बसून काम करणार आहे. ही अभिमानाची बाब आहे. 

पिंपरीला झुकत माप 
पुण्यात 30 पोलिस ठाणे असताना त्यांना दोन कोटी दिले. अन्‌ पिंपरीला पंधरा ठाणे असतानाही दोन कोटी दिले. खरे तर एकच कोटी द्यायला हवे होते. पण, पिंपरी पोलिस दल चांगले काम करीत असल्याने पिंपरीला झुकते माप दिले. पण यामध्ये सातत्य रहायला हवे. यामध्ये गडबड झाल्यास हाच अजित पवार काय बोलेल तुम्हाला कळणारही नाही. मी सर्वतोपरी सहकार्य करीत असताना आम्ही चांगल्या कामाची, कायदा-सुव्यवस्थेची अपेक्षा का करू नये, असे अजित पवार म्हणाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com