पिंपरी - माघारीची परंपरा राष्ट्रवादीत कायम; भाजपला फायदा ​

ncp
ncp

पिंपरी - महापालिकेत फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत सत्तांतर झाले. सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले. मात्र, विरोधी पक्ष म्हणून गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव दिसलाच नाही. या कालावधीत उपमहापौरपदासाठी पाच वेळा निवडणूक झाली. केवळ एकच निवडणूक राष्ट्रवादीने लढवली. चार निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले. पण, ऐनवेळी माघार घेऊन सत्ताधारी भाजपची किंमत वाढवली. मंगळवारच्या (ता. २३) उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही हेच चित्र बघायला मिळाले.

महापालिकेत २००२ पासून २०१७ पर्यंतच्या तीन पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर होती. भाजपचे प्रतिनिधित्व केवळ बोटावर मोजण्या इतकेच होते. कॉंग्रेस विरोधी पक्ष होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत सत्तांतर झाले. १२८ पैकी ७७ जागा जिंकत भाजप सत्तेवर आला. राष्ट्रवादीला ३६ नगरसेवक घेऊन विरोधात बसावे लागले. अर्थात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेल्यांची भूमिका यात महत्त्वाची ठरली होती. तेव्हापासून आजपर्यंत भाजपचे पाच उपमहापौर झाले. म्हणजेच या पदासाठी पाच वेळा निवडणूक झाली. फक्त चार ऑगस्ट २०१८ रोजी झालेली निवडणूक राष्ट्रवादीने लढवली. यावेळी भाजपचे सचिन चिंचवडे यांना ७९ व उपमहापौर झालेल्या विनया तापकीर यांना ३२ मते मिळाली होती. त्यामुळे चिंचवडे उपमहापौरपदी विराजमान झाले होते.

माघार घेतलेल्या निवडणुका
- महापालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर १४ मार्च २०१७ रोजी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी भाजपचे नितीन काळजे महापौर झाले होते. राष्ट्रवादीचे श्‍याम लांडे यांनी माघार घेतली होती. याच वेळी राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे भाजपच्या शैलजा मोरे उपमहापौर झाल्या होत्या.

- भाजपचे पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे भाजपचे राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे २२ नोव्हेंबर २०१९ रोजी निवडणूक झाली. भाजपचे तुषार हिंगे व राष्ट्रवादीचे राजू बनसोडे उपमहापौरपदासाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी बनसोडे यांनी माघार घेतली व हिंगे बिनविरोध निवडून आले. या वेळी महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे विराजमान झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्वाती काटे यांचा पराभव केला होता. त्यामुळे उपमहापौर निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता.

- पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार भाजपच्या तुषार हिंगे यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सहा नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. त्यातूनही राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. त्यामुळे भाजपचे केशव घोळवे बिनविरोध निवडून आले होते.

- घोळवे यांनी वैयक्तिक कारणावरून गेल्या पाच मार्च रोजी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्तपदासाठी मंगळवारी (ता. २३) निवडणूक झाली. त्यातूनही राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि भाजपच्या हिराबाई घुले बिनविरोध निवडून आल्या.

‘‘उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्या वेळी भाजपचा उमेदवार कोण? हे माहीत नव्हते. मात्र, त्यांनी एका ज्येष्ठ महिलेला उमेदवारी दिली. आमच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यामुळेच महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिला नगरसेविकेविरुद्ध निवडणूक लढविणे पक्षाच्या व साहेबांच्या धोरणाविरुद्ध ठरले असते. त्यामुळे माघारीचा निर्णय घेतला.’’
- पंकज भालेकर, उपमहापौर निवडणूक उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com