पिंपरी : कंपन्या सुरू झाल्या; पण कच्चा माल येथे अडकलाय

सुधीर साबळे
शनिवार, 23 मे 2020

उद्योगनगरीतल्या उद्योजकांना कच्चा माल मिळवण्यात अडचणी येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपूर्वी लावलेला लॉकडाउन आता शिथिल होऊ लागला आहे. उद्योगनगरीत अनेक दिवसांपासून ठप्प असणारे उत्पादन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असले, तरी कच्चा माल पोचवण्यासाठी ट्रकवर उपलब्ध नसणारे ड्रायव्हर, तसेच कच्चा मालाच्या ट्रेडिंगसाठी प्रसिध्द मुंबईतील दारूखानाचा परिसर अद्याप बंद आहे. या कारणांमुळे उद्योगनगरीतल्या उद्योजकांना कच्चा माल मिळवण्यात अडचणी येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सद्यस्थिती काय ? 

गेल्या आठवड्यात उद्योगनगरीमधल्या कंपन्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली. त्यानंतर अनेक उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीचा अर्ज दाखल केला आणि सुमारे सहा हजार उद्योगांनी कामाला सुरुवात केली. काही कंपन्यांनी उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालाचा वापर करून उत्पादन निर्मितीला सुरुवात केली. मात्र, काही जणांनी उत्पादन निर्मितीसाठी आवश्‍यक असणाऱ्या कच्च्या मालासाठी नोंदणी करून तो लवकर कसा मिळेल, यासाठी पाठपुरवठा सुरू केला. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी या उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होत असला, तरी त्याच्या दरामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. आधीच लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू कमकुवत झाली असताना जादा दराने खरेदी कशाला करायची म्हणून उद्योजकांनी मुंबईमधून कच्चा माल मागवण्याच्या हालचाली सुरू केल्या. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मुंबईत कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे अनेक पुरवठादारांचे उद्योग अनेक दिवसांपासून बंद आहेत. तसेच मुंबई बाहेरील कळंबोली, तळोजा या भागातून कच्चा माल मिळवण्यासाठी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. मात्र, त्याठिकाणी देखील कच्चा माल पोहोचवण्याच्या ट्रकवर ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळे तो पोचवायचा कसा, अशी अडचण पुरवठादारांसमोर उभी राहिली आहे. त्यामुळे इथल्या उद्योजकांना कच्चा माल मिळवण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे ट्रक चालवण्याचे काम करणारे अनेक चालक आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळेच कच्च्या मालाच्या पुरवठादारांसमोर ही समस्या निर्माण झाली आहे. उद्योगनगरीतल्या उद्योगांना होणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा हा मुंबईतूनच केला जातो. तिथून येणाऱ्या कच्च्या मालामध्ये लोखंडाचे सुटे भाग, कॉपर, स्टील, यांचा समावेश असतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

उद्योजक म्हणतात... 

उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल मिळत नसल्यामुळे उत्पादन सुरू कसे करायचे ही समस्या आम्हाला भेडसावत आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असल्यामुळे याठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे ती सुरू झाल्यानंतरच कच्च्या मालाच्या पुरवठ्याला नियमितपणे सुरुवात होणार असल्याचे उद्योजक प्रमोद राणे यांनी सांगितले. 

  • उद्योगनगरीत कार्यरत असणाऱ्या कंपन्या : 11, 000 
  • लॉकडाउनपूर्वी दररोज कच्चा माल घेऊन येणाऱ्या गाड्यांची संख्या : दीड ते दोन हजार 
  • येणाऱ्या कच्च्या मालाचे प्रमाण : सुमारे 80 हजार टन 
  • सध्या या प्रमाणात 30 ते 40 टक्‍यांनी घट झाली आहे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties in getting raw materials for industrialists at pimpri chinchwad