निगडी-रुपीनगरमधील रस्ते खोदाईला नागरिक वैतागले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

  • निगडी- रुपीनगरमधील करवीर सोसायटी परिसरातील स्थिती 

रुपीनगर (पिंपरी-चिंचवड) : ऐन पावसाळ्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या मुख्य रस्त्यामुळे आमची पूर्ण गैरसोय होत आहे. रस्ता नसल्याने आम्हाला दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. मग आमच्या गाड्या बाहेर काढणे तर दूरच राहिले, अशी कैफियत करवीर हाउसिंग सोसायटीतील रहिवाशांनी मांडली. आठवडाभरापासून हे काम सुरू असून, सुमारे पाचशे मीटरचा रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे. सध्या केवळ शंभर मीटर रस्त्याचे काम झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रुपीनगरमधून तळवडे एमआयडीसीकडे, तसेच ताथवडे आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणारा हा रस्ता असल्याने त्यावर गाड्यांची कायम ये-जा असते. त्यात कामगार व रहिवाशांची खूपच गैरसोय होत आहे. कामगारांना पर्यायी मार्ग उपलब्ध असला, तरी सोसायटीतील लोकांना मात्र घराबाहेर पाऊल टाकणे मुश्‍कील झाले आहे. दैनंदिन गरजेची कामे, भाजीपाला, दळण आदी कामासाठीही घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. काम झाल्यानंतर मागील रस्ता पूर्ववत करावा किंवा काम चालू असताना राडारोडा एका बाजूला टाकून एक बाजू पादचाऱ्यांसाठी खुली ठेवावी, अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे काम संपवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कामाच्या गतीवरून हे काम पूर्ण होण्यास आणखी किमान महिना लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. काम चालू असताना मधूनच कोसळणारा पाऊस, नादुरुस्त यंत्रसामग्री आदी कारणांमुळेही या कामास विलंब होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दृष्टिक्षेप 
- महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत करवीर सोसायटीपासून सुरू झालेले खोदकाम कोयना, इंद्रायणी आणि कर्मवीर सोसायटीतून रुपीनगरच्या मुख्य रस्त्यापर्यंत असेल. 
- मुख्य रस्त्यावरून वळताना या कामाबाबत कोणतीही सूचना नसल्याने वाहनचालकांना काम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर माघारी फिरताना कसरत करावी लागत आहे. 
- काम सुरू करताना एकच दिवस रस्त्याकडेला फलक लावला होता. मात्र, आता तोही गायब आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digging of roads in nigdi-rupinagar annoys the citizens