कोरोनामुळे शिक्षकाचं निधन; पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांनी केलीय ही मागणी

कोरोनामुळे शिक्षकाचं निधन; पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांनी केलीय ही मागणी

पिंपरी : शहरातील कोरोना सर्व्हेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आहे. अशातच कोरोनाची लागण झाल्याने महापालिका माध्यमिक विभागाच्या एका चित्रकलेच्या शिक्षकाचं निधन झालं. यामुळे शिक्षकांनी धास्ती घेतल्यानं किमान पन्नास वर्षांपुढील शिक्षकांना, ज्यांना इतर आजार आहेत, अशा कर्मचाऱ्यांना सर्व्हेक्षणातून मुक्त करण्याची मागणी शहरातून होत आहे. 

बचाव साधने नाही

शहरात गेल्या पाच महिन्यांपासून शिक्षक 'कोरोना ड्यूटी' बजावत आहेत. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा साधने नाहीत. फक्त त्यांच्याकडे एक थर्मलगन सोपवली आहे. त्याच्याच आधारे गल्लोगल्ली, झोपडपड्यांमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत सर्व्हेक्षण सुरू असते. जीव धोक्‍यात घालून काम करत असल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. एका शिक्षकाचा कोरोना बळी गेल्यामुळे आतातरी सुरक्षा साधने, पीपीई किट देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. अनेक शिक्षकांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून रजा मंजूर करून घेतल्या आहेत. शिक्षकांवर ही जबाबदारी टाकू नये, अशी मागणी पिंपरी चिंचवड सर्व शिक्षक संघटनांनी आयुक्तांकडे केली होती, परंतु, या मागणीला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या.

शिक्षकाचा पहिला बळी गेल्याने शिक्षक वर्गात कमालीची भीती निर्माण झाली आहे. पण अद्यापही 50 वर्षांपुढील शिक्षक कोरोना ड्यूटी निभावत आहेत. त्यांना तरी या ड्यूटीतू वगळा, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामेश्‍वर पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेमार्फत कोरोना संसर्ग प्रतिबंध अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी विमा जाहीर केलेला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या चित्रकलेच्या  शिक्षकाची ही पालिकेतील पहिली केस झाली आहे. तरी त्यांना तो विमा संरक्षण लवकरात लवकर मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

प्रेमळ शिक्षक हरपला 

ते वाकड माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक म्हणून होते. ते नेहमी सर्व सहकाऱ्यांशी, विद्यार्थ्यांशी मनमिळाऊ स्वभावाने राहायचे. चित्रकलेचे अध्यापन करून उत्कृष्ट चित्रकार तयार केले आहेत. त्यांनी जागतिक आपत्ती कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठीचे 11 ते 24 जूनदरम्यान 14 दिवसाचे हे काम पालिकेच्या थेरगाव हॉस्पिटल अंतर्गत व्यवस्थित पार पाडले. पण दुदैवाने त्यांना काही दिवसातच कोरोना संसर्ग झाला. त्यांच्यावर चिंचवडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या घरच्यांना ही संसर्ग झाला आहे व त्यांच्यावर ही उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com