Video : मावळात भात लागवड झाली...पीकं तरारलं पण, पाऊसचं गायब!

मंगळवार, 30 जून 2020

दोन आठवड्यापूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणी केली, त्यानंतर भातरोपेही तरारली आहेत.

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : दोन आठवड्यापूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणी केली, त्यानंतर भातरोपेही तरारली आहेत. मात्र, आठवडाभरापासून गायब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी रखरखत्या उन्हामुळे शिवारातील रोपे सुकू लागली आहेत. तसेच, भात लागवडही रखडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

निसर्ग चक्रीवादळानंतर आंदर, नाणे व पवन मावळ भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीस वेग धरला आणि भात पेरणी केली. मात्र, मध्यंतरी बंद झालेल्या पावसामुळे पेरलेली बियाणे खराब होऊन काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. दोन आठवड्यापूर्वी पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या केलेली रोपे चांगलीच तरारली आहेत. मात्र, सध्या लागवडीयोग्य झालेली रोपे आता पावसाअभावी व रखरखत्या उन्हामुळे सुकू लागली आहेत. याउलट दीड महिन्यापूर्वी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली रोपे आता तरारली असून, शेतकऱ्यांनी लागवडीस सुरुवात केलेली दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठवडाभरापूर्वी दडी मारलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीप्रमाणे पाऊस उशीरा हजेरी लावतो, की काय यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामास ब्रेक मारला आहे. आंदर व नाणे मावळ भागात पाऊस पडेल, या आशेने लागवड केलेली रोपे पावसाअभावी व रखरखत्या उन्हामुळे सुकू लागल्याने रोपे मरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यावर्षी शिवरात गवताचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांसमोर अजून एक चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून भात लागवड

आंदर, नाणे व पवन मावळ भागात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी भात पेरण्या केल्या आहे. रोपेही चांगली आली असून, शेतकऱ्यांनी भात लावणीस सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्याने या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांची मदत मिळत आहे. तसेच मजुरांचाही तुडवडा भासत नसून भातलागवडीस वेग आला आहे. सध्या ट्रॅक्टरही उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी भात लावणीसाठी चिखल ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून घेत आहे.