जावयाला यंदा सासरवाडीचा 'सोशल डिस्टन्स', धोंडे जेवणावर कोरोनाचं विघ्न 

गणेश बोरुडे 
Sunday, 4 October 2020

  • धोंडे जेवणावर कोरोनाचे विघ्न; नवविवाहित दाम्पत्यांना तीन वर्षे वाट पहावी लागणार 

तळेगाव स्टेशन (ता. मावळ) : अधिक मासातील धोंड्याच्या जेवणासाठी सासरच्या मंडळींकडून जावईबापूंना विशेष मान असतो. मात्र, त्यावर कोरोनामुळे बंधने आली आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीत बोहल्यावर चढलेल्या जावईबापूंच्या मानपानावर यंदा कोरोनाचे विघ्न विराजमान झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मी-नारायणस्वरूप मानून अनारशांचे वाण देण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी जावयाला दीपदान आणि लेकीला खण देण्याची प्रथा होती. मात्र, काळानुरूप आर्थिक परिस्थिती बदलली, तशी वाणाचे संदर्भही बदलले. जावयाला सोन्याची चेन, मुलीला अंगठी, सासू-सासऱ्यांना कपडेलत्ते आणि चांदीच्या ताटातले अनारशांचे वाण सासरच्या मंडळींकडून दिले जाते. त्यामुळे धोंड्याचा महिना जावईबापूंसाठी एक शाही पर्वणीच ठरते. पुरण घालून केलेल्या 33 धोंड्यांमध्ये एखादा सोन्याचा दागिना गवसण्याची अपेक्षा जावयाला असते. दोन-तीन लेकींच्या बापाच्या घरी धोंड्याचे जेवण म्हणजे एक मोठा सोहळाच. मात्र, कोरोनामुळे बऱ्याच सासरेबुवांनी लाडक्‍या जावईबापूंना धोंडे खाण्यासाठी बोलावणे धाडलेले दिसत नाही. शहरी भागासोबतच मावळातील काही जावईबापूंना कोरोनामुळे या पर्वणीची आणखी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे. चाकण व तळेगाव एमआयडीसी औद्योगिक पट्ट्यात नोकरीनिमित्ताने स्थायिक झालेल्या विदर्भ व मराठवाड्यातील जावयांनी कोरोनामुळे सासुरवाडीपासून सोशल डिस्टन्स राखले आहे. तसेच, स्थानिक जावयांनाही सासुरवाडीकडून विशेष आग्रह धोंडे जेवणासाठी केला जात नसल्याचे दिसते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बहुतांश जावई हिरमुसले असले, तरी लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात असलेल्या सासरच्यांना मात्र वाढीव खर्चातून दिलासा मिळाला आहे. सोन्याचे भाव पन्नास हजाराला पोचल्याने सोन्याचे वाण मध्यमवर्गीय किंवा शेतकरी कुटुंबातील सासऱ्यांना झेपेना झाले आहे. याचाच परिणाम सोने-चांदी आणि कपड्यांच्या खरेदीवर जाणवतो आहे. अधिकमासात गावोगावी आयोजित केले जाणारे भागवत पुराणाचे सप्ताह, दान, स्नान असे विविध धार्मिक कार्यक्रमही कोरोनामुळे होऊ शकलेले नाहीत. 

खरेदी तुरळकच... 
कोरोनामुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी दिसत नाही. सोने-चांदीचे भाव वाढल्यामुळे सधन मंडळीच तुरळकपणे धोंड्याचे वाण खरेदीसाठी येत आहेत, असे तळेगावातील भगवती ज्वेलर्सचे अमेय मालपाठक यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
मे महिन्यात लॉकडाउनमध्ये मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्थितीत मुलीचे शुभमंगल उरकले. मात्र, परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने जावईबापूंना धोंडे जेवणासाठी न बोलविता, वाण पार्सल पाठविण्याच्या विचारात आहे. 
- संजय चव्हाण, इंदोरी 

धोंड्याचा महिना तीन वर्षांनी पुन्हा येईल. मात्र, सद्यःस्थितीत कोरोनाचा धोका पत्करणे जोखमीचे ठरेल. लग्नानंतरचा पहिलाच अधिकमास असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह पुरेशी खबरदारी घेऊनच सासुरवाडी माजलगावला धोंडे जेवणाचा सोपस्कार पूर्ण करून आलो. 
- श्‍याम काळे, तळेगाव दाभाडे  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father in law keep social distance from son in law