esakal | खासगी बसचालकांनाही फटका; कामगारांची आर्थिक कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसचालकांनाही फटका; कामगारांची आर्थिक कोंडी

आरामदायी आणि वेळेत प्रवासासाठी प्रवाशांकडून प्राधान्य देण्यात येणाऱ्या 
खासगी बस गेल्या 40 दिवसांपासून बंद आहे.

खासगी बसचालकांनाही फटका; कामगारांची आर्थिक कोंडी

sakal_logo
By
अवधूत कुलकर्णी

पिंपरी : आरामदायी आणि वेळेत प्रवासासाठी प्रवाशांकडून प्राधान्य देण्यात येणाऱ्या 
खासगी बस गेल्या 40 दिवसांपासून बंद आहे. अर्थातच कारण आहे, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनचे. मात्र, त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरात आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील मैदान, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मैदान, लांडेवाडी पेट्रोल पंपानजिकचे मैदान, निगडी येथील उड्डाणपुलाजवळील मोकळी जागा आणि भोसरीतील एमआयडीसीच्या उद्यानालगतची जागा, अशा पाच प्रमुख ठिकाणी खासगी बस थांबलेल्या असतात. राज्याच्या विविध भागात ये-जा करण्यासाठी येथूनच बस सुटतात. परीक्षा झाल्यानंतर तसेच, सणासुदीला या बसचे भाडेही जास्त असते. या व्यावसायिकांच्या दृष्टीने हा काळ सुगीचा समजला जातो. मात्र, सध्या अर्थव्यवस्थेची चक्रेच थांबली असल्याने त्याचा फटका या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात उभ्या असणाऱ्या बहुतेक बस या लातूर, बार्शी, उद्‌गीर, सोलापूर, धुळे आदी जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या आहेत. त्यामुळे लॉकडाउन सुरू होण्याच्या सुमारास या व्यावसायिकांनी त्यांच्या बस त्यांच्या गावाला नेऊन ठेवल्या आहेत. या बसच्या राज्याच्या विविध भागात महिन्याला हजारो फेऱ्या होत असतात. अनेक व्यावसायिकांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन या बस घेतलेल्या आहेत. बस जागेवरच उभ्या असल्याने उत्पन्न बंद आहे. त्यामुळे या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्‍न या व्यावसायिकांना पडला आहे. तसेच काही बसचे ड्रायव्हर, क्‍लीनर हे परप्रांतीय आहेत. ते त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपल्यावरही सर्वच बस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणे शक्‍य नाही. त्यामुळे मागणीच्या मानाने पुरवठा कमी होणार असल्याने प्रवाशांना भाडेवाढीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. 

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढविणारी बातमी; एकाच दिवशी कोरोनाचे...

काय आहे सद्यःस्थिती 

या क्षेत्रात केवळ चालक, वाहकच नाही; तर वाहनांची देखभाल दुरुस्ती करणारे, कार्यालयांमधील रिसेप्शनिस्ट, मोबाईलवर ग्राहकांचे बुकिंग घेणारे, असे विविध घटक कार्यरत असतात. सध्या बस जागेवरच उभ्या असल्याने त्यांच्या बॅटऱ्या खराब होण्याची शक्‍यता आहे. उंदरांमुळे बसच्या केबल कुरतडून नुकसान होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर व्यावसायिकांना बसच्या देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही बॅंकांनी कर्जदारांना त्यांच्या वाहनकर्जाचा कालावधी दोन वर्षांपर्यंत वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बॅंकांना जास्त व्याज मिळेल, तर कर्जदारांचा हप्ता कमी होईल. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकडे बोलतात 

- पाच थांब्यांवर उभ्या असणाऱ्या मोठ्या खासगी बस - 200 

- कंपनीसाठीच्या मिनी, मध्यम आकाराच्या बस - 800 

- बसचालक, वाहकांची संख्या - 2000 हून अधिक 

- एका बसच्या कर्जावरचा मासिक हप्ता - 80 ते 90 हजार रुपये 

- महिन्याला होणारी आर्थिक उलाढाल - 50 कोटी रुपयांहून अधिक 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शहरात बीड, लातूर, उस्मानाबाद, कर्नाटक येथील वाहनचालक, क्‍लीनर आहेत. काम नसल्याने सर्वजण त्यांच्या गावी गेले आहेत. काहीजणांची जमीन असल्याने ते शेती करीत आहेत, तर काहीजण गवंडीकाम करत आहेत." 

- नंदकिशोर नीला, टूरिस्ट व्यावसायिक - कासारवाडी