
Pune News : पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला पहिल्यांदा शून्य कचरा विवाह सोहळा
जुनी सांगवी : आजवर अनेक प्रकारचे विवाहसोहळे आपण पाहिले मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बेसिक्स संस्थेच्या कर्मचा-याने चक्क "शुन्य कचरा विवाह सोहळा" पार पाडल्याने एका अनोख्या विवाहसोहळयाचा पिंपरी चिंचवडकरांनी अनुभव घेतला. यातून स्वच्छतेचा जागर व प्रबोधन व्हावे या उद्देशाने हा अनोखा विवाह सोहळा पार पाडण्यात आला.
बेसिक्स संस्था कर्मचारी विशाल मिठे यांनी आपल्या बहिणीच्या विवाहसोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा उत्सर्जित होणार नाही याची काळजी घेत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. एकीकडे मंगलाष्टके व दुसरीकडे टीम बेसिक्सचे प्रतिनिधी यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला पहिल्यांदा शून्य कचरा विवाह सोहळा
या लग्नात केवळ शून्य कचरा उत्सर्जित होण्यास प्रतिबंध करण्यात आला नाही तर लग्नसोहळ्याला उपस्थित मान्यवरांना स्वच्छते बाबतचे महत्व पटवून देण्यात आले. प्लॅस्टिकचा वापर तसेच कागदी ग्लास किंवा प्लेटचाही वापर केला गेला नाही. प्लॅस्टिक विरहीत असा हा विवाहसोहळा केला गेला
या पुढील काळात सर्वच मंगल कार्यालयांमधील प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याबाबत संबंधितांना विनंती करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकनिर्मूलन हा स्वच्छता मोहिमेतील सर्वात महत्वाचा घटक आहे. कचरा विलगीकरणासोबतच प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याबाबत प्रबोधन करण्याचा हा एक प्रयत्न होता.असे विशाल मिठे यांनी सांगितले.
नववधू वरांना बेसिक्स संस्थेकडून कचरा विलिनीकरण करण्यासाठी डस्टबिन देण्यात आले. लग्न मंडपात स्वच्छता संदेश फलक लावण्यात आले होते.लग्नसोहळ्याबाबत शुन्य कचरा विवाह सोहळा अशा आशयाचा संदेश फलक लावण्यात आले होते.
काळेवाडी फाटा येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास माजी महापौर उषा ढोरे, महेश आढाव सहा.आरोग्याधिकारी, ड प्रभाग, बाबासाहेब कांबळे सहा.आरोग्याधिकारी, ग प्रभाग, सतिश पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभाग, प्रणय चव्हाण आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभाग आदी उपस्थित होते.
स्वच्छ शहराच्या ध्येयपूर्तीसाठी या आगळावेगळा विवाह सोहळ्यातून समाजप्रबोधन करण्यात आले. स्वच्छ,सुंदर शहरासाठी सर्वांनी स्वच्छतेच्या कामात स्वतः चे योगदान करणे अपेक्षित आहे.
- उषा ढोरे माजी महापौर पि.चि.महापालिका