भडकलेल्या तेलाचे गृहिणींना 'चटके'

Food-Oil
Food-Oil

पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला आली आहेत, अशी प्रतिक्रिया मोशी प्राधिकरणातील गृहिणी सुनीता रायकर यांनी व्यक्त केली. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. स्वयंपाकघरात तेलाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. गेल्या वर्षी सूर्यफूल तेलाचा दर ९८ ते १३४ रुपये प्रति लिटर होता. त्यात पुन्हा ४६ रुपयांची वाढ झाली असून, सध्या सूर्यफूल तेलाचा दर लिटरमागे १८० रुपये झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पामतेलाने कंबरडे मोडले
सर्वसामान्य आणि गरिबांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच पामतेलाने शंभरी गाठल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या बाजारात पामतेलाचा दर एक लिटरसाठी ११० ते ११५ रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी तो ७५ ते ८५ रुपयांच्या आसपास होता. हॉटेल व्यावसायिकांकडून पाम तेलाची सर्वाधिक खरेदी केली जात आहे.

स्वयंपाकात तेल कमी करून कसे चालेल. गोड्या तेलाला महागाईच्या दराची फोडणी मिळाल्याने तळणीचे पदार्थ बनविण्यावर मर्यादा आल्या आहेत. प्रती लिटरचे दर १४० पासून १७० वर गेल्यामुळे चमचमीत पदार्थ आम्ही बनवत नाही. सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे.
- शेहनाज शेख (गृहिणी बिजलीनगर, चिंचवड)

खाद्यतेलाच्या अचानक किंमती वाढल्याने जेवणाच्या थाळीची पंचाईत झाली आहे.
- गौरी साकुरे, खानावळ-आकुर्डी

सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाची सतत वाढ होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक आणि वितरण खर्च वाढला आहे. १५ लिटर तेलाचा डबा १३०० रुपयांवरून २१०० रुपये झाला आहे. दररोज बदलत असलेल्या किमतीमुळे होलसेल खरेदीत नुकसान होत आहे. ग्राहक आणि विक्रेते यांना खाद्यतेलाची दरवाढ परवडत नाही. सरकारच्या धोरणामुळे किरकोळ व्यापारी नुकसानीत आहेत.
- निकिता आतकरे, तेल व्यापारी चिखली

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com