शिवसेना कार्यकत्यावर गोळ्या झाडल्या, लोणावळ्यात 24 तासांत दोघांची हत्या

Former Shiv Sena city president Rahul Shetty and his colleague Ganesh Naidu killed in Lonavla
Former Shiv Sena city president Rahul Shetty and his colleague Ganesh Naidu killed in Lonavla

लोणावळा : शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी यांची सोमवारी (ता. 26) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुसऱ्या घटनेत त्यांचाच साथीदार असलेल्या गणेश कुमार नायडू याचा रविवारी (ता. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे लोणावळा हादरले आहे. शेट्टी हत्याप्रकरणी दोघा संशयितांना, तर नायडू खूनप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. शेट्टी यांची हत्या पूर्वनियोजित आणि पूर्व वैमनस्यातून झाली असावी, असा अंदाज जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी हे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जयचंद चौकातील आपल्या घराबाहेर बसले होते. त्यावेळी एक हल्लेखोर त्यांच्या जवळ आला. त्याने शेट्टी यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. तसेच, कुऱ्हाडीनेही वार केले. घटनेनंतर हल्लेखोर पायीच पसार झाला. त्यानंतर शेट्टी यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणी माजी नगरसेविका व राहुल शेट्टी यांच्या पत्नी सौम्या शेट्टी यांनी फिर्याद दिली. देशमुख यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, सहायक पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, मनोजकुमार यादव आदींनी घटनास्थळी भेट दिली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनास्थळावरून पोलिसांनी तीन रिकाम्या पुंगळ्या व एक कुऱ्हाड जप्त केली. दुसऱ्या घटनेत रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश कुमार नायडू (वय 44, रा. हनुमान टेकडी, लोणावळा) यांचा धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मोबीन अब्दुलगनी बेबल (वय 38, रा. हनुमान टेकडी, लोणावळा) व शंकर शिर्के (रा. कार्ला, मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या घटनेत बेबल हाही जखमी झाला आहे. त्यास अटक केली आहे, तर शिर्के फरारी आहे. गणेश यांचा मुलगा विजय नायडू याने फिर्याद दिली. गणेश, मोबीन व शंकर यांच्यात रविवारी रात्री हनुमान टेकडीवर वादावादी झाली. यावेळी मोबीनने धारदार शस्त्राने गणेशवर वार केले. तसेच डोक्‍यात दगड घालून खून केला. यावेळी झटापटीत मोबीन हाही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गणेश हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेट्टी यापूर्वी दोन वेळा वाचले 
राहुल शेट्टी यांच्यावर वैयक्तिक कारणावरून दोन वेळा प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून ते बचावले होते. मावळ तालुका शिवसेनेचे संस्थापक उमेश शेट्टी यांचे पुत्र असलेले राहुल शेट्टी यांचीही वडिलांप्रमाणेच हत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लोणावळा परिसरात तणाव असून, शेट्टी यांच्या हत्येनंतर मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले. 

लोणावळ्यात यापूर्वीच्या घटना 
- शिवसेना नेते उमेश शेट्टी हत्या 
- नगराध्यक्ष राजू चौधरी यांची हत्या 
- एका रात्रीत सात फिरस्त्यांचे खून 
- सिंहगड विद्यालयातील दुहेरी हत्याकांड 

'तपासासाठी सहा पथके' 
शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी काही संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, तपासासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाल्याची माहिती अभिनव देशमुख यांनी दिली. आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com