पोलिस बांधवांनो सावधान; पिंपरीत चार जणांना कोरोना संसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे. दोन दिवसांपूर्वी एका सहायक निरीक्षकाला संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घशातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील काहींचे अहवाल बुधवारी दुपारी आले. त्यात एक पोलिस निरीक्षक, एक महिला उपनिरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात 10 मार्च आणि पिंपरी-चिंचवड शहरात 11 मार्च रोजी कोरोनाचे पहिले रुग्ण आढळले. तेव्हापासून दोन्ही शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. रुग्ण आढळलेले भाग कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले जात आहेत. जमावबंदी, संचारबंदी लागू आहे. बंदोबस्तासाठी पोलिस तैनात आहेत. मात्र, त्यांनासुद्धा संसर्ग झाला आहे. पुणे शहर पोलिस दलातील पहिला कर्मचारी महिन्यापूर्वी कोरोना बाधित आढळला. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पोलिस ठाण्यात ते कर्तव्यावर होते. त्यांच्या शेजारी राहणारा त्यांचा मित्र पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात कार्यरत आहे. त्यावेळीच पिंपरी-चिंचवड पोलिस दलातही शिरकाव झाला की काय? अशी भिती व्यक्त केली जात होती.

त्यामुळे "त्या' कर्मचाऱ्यासह तो कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

कालांतराने पुणे पोलिस दलातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय बरे होऊन घरीही परतले आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात पुणे शहर पोलिस दलात कार्यरत आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या आणखी दोन पोलिसांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले होते. मात्र, व्हायचे तेच झाले आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका सहायक निरीक्षकाला बाधा झाल्याचे दोन दिवसांपूर्वी आढळले व पुन्हा पोलिस दल हादरले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील संसर्ग झालेल्या सहायक निरीक्षकाच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील काहींचे रिपोर्ट बुधवारी दुपारी आले. त्यात एक पोलिस निरीक्षक, एक महिला उपनिरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचे आढळले. 

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सात ते बुधवारी दुपारी तीन या वीस तासांत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील तीन जण आनंदनगर परिसरातील आहेत. आज 14 दिवसांच्या उपचारानंतर पाच जणांना घरी सोडण्यात आले. बुधवारी दुपारी तीनपर्यंत शहरातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 240 झाली. त्यातील 138 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 96 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येरवड्यातील एकाचा मृत्यू 
पुणे शहर, जिल्हा व जिल्ह्याबाहेरील रहिवासी असलेले व्यक्तीही महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची एकूण संख्या 42 झाली आहे. त्यातील 21 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा मृत्यू आज झाला आहे. ही व्यक्ती पुण्यातील येरवडा भागातील रहिवासी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four police were infected with corona in Pimpri-Chinchwad