पिंपरीत आज राष्ट्रवादी-भाजप आमने सामने; दोनदा तहकूब झालेली सर्वसाधारण सभा होणार

पिंपरीत आज राष्ट्रवादी-भाजप आमने सामने; दोनदा तहकूब झालेली सर्वसाधारण सभा होणार

पिंपरी : विविध कारणांनी दोन वेळा तहकूब केलेली महापालिका सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ९) दुपारी दोन वाजता होत आहे. त्यात पूर्वीच्या नियोजनानुसार विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हल्लाबोल करतात की गप्प बसतात आणि सत्ताधारी भाजपची विरोधकांना डावलण्याची खेळी यशस्वी होते की विरोधाचा सामना करतात, याकडे लक्ष लागले आहे. नेमकं सभागृहात काय घडणार? याचीही उत्सुकता लागून आहे. 

विविध कारणांनी म्हणा अथवा सत्ताधारी भाजपचा पळपुटेपणा, विरोधकांचा केवळ दिखाऊपणा म्हणा अथवा भाजपची त्यांच्यावरील यशस्वी चाल, कारण काहीही असले तरी, फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा पीठासन अधिकारी अर्थात महापौर उषा ढोरे यांनी दोन वेळा तहकूब केली आहे. फेब्रुवारीच्या १८ तारखेला नियोजित सभा होती. याच सभेत स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी प्रत्येक पक्षाच्या कोट्यानुसार सदस्य निवड होणार होती. यात सत्ताधारी भाजपचे चार, विरोधी राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक अशा सदस्यांचा समावेश होता. त्या नियोजनानुसार सभा सुरू झाली. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सदस्यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे अनुपस्थित होते. त्यांच्या वतीने अपक्ष नीता पाडाळे यांनी सदस्याच्या नावाचा लिफाफा पीठासन अधिकाऱ्यांकडे दिला. तो पाडळे यांच्याच नावाचा असल्याची कुणकूण विरोधकांनी लागली आणि त्यांनी नाव जाहीर करण्यास आक्षेप घेतला. त्यावर भाजप पीठासन अधिकाऱ्यांनी नाव जाहीर करण्याची भूमिका घेतल्याने गोंधळ झाला. एकमेकांना ढकलाढकली झाली आणि वाढलेल्या गोंधळातच महापौर ढोरे यांनी नाव जाहीर करत सभा २२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. एक प्रकारे भाजपचे ईप्सित साध्य झाले. कारण, अपक्ष पाडाळे भाजप समर्थक आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२२ फेब्रुवारीचे नाट्य 
तहकूब सभा दुपारी दोन वाजता होती. त्यात ‘भाजप हटाव, पीसीएमसी बचाव’चा नारा राष्ट्रवादीचे नगरसेवक देणार होते. या आशयाचे ॲप्रण घालून ते सभागृहाकडे निघाले. याची कुणकूण भाजपला लागली आणि पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांनी कामकाज सुरू केले. ‘कोरमअभावी सभा तहकूब करावी’, असा प्रस्ताव मांडून अनुमोदन मिळाले. ते स्वीकारून ढोरे यांनी सभा नऊ मार्चपर्यंत तहकूब केली. त्या सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विरोधक पोहोचले. परंतु, त्यापूर्वीच भाजपने डाव साधला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा डाव फसला होता. 

काही अनुत्तरीत प्रश्‍न 
- सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक एकमेकांशी बोलून २२ फेब्रुवारीचे नाट्य घडवून आणले? 
- आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘आम्ही मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा,’ असे धोरण होते का? 
- राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही नगरसेवक सभा सुरू होण्यापूर्वीच का नाही आले? की मुद्दाम उशीर केला? 
- इतर वेळी पाच-दहा मिनिटे उशिरा सुरू होणारी सभा ‘त्या’ दिवशीच नेमकी वेळेवर कशी सुरू झाली? 
- नऊ फेब्रुवारीची सभा होईल की, पुन्हा तहकूब केली जाईल? राष्ट्रवादी आक्रमक असेल की भाजपची चाल? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com