उद्योगनगरीच्या पोलिस दलात निम्मे उच्चशिक्षित

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021


पोलिस भरतीसाठी पूर्वी सातवी, आठवी शैक्षणिक अर्हता होती. १९९३ पासून दहावी झाली तर २००५ पासून भरतीसाठी शैक्षणिक अर्हता बारावी करण्यात आली.

पिंपरी  : पोलिस दलात भरती होण्यासाठी शैक्षणिक अर्हता बारावी असली तरी सध्या उच्च शिक्षितही पोलिस दलात भरती होताना दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या अडीच हजारपैकी तब्बल एक हजार ३०७ कर्मचारी पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहेत.

पोलिस भरतीसाठी पूर्वी सातवी, आठवी शैक्षणिक अर्हता होती. १९९३ पासून दहावी झाली तर २००५ पासून भरतीसाठी शैक्षणिक अर्हता बारावी करण्यात आली. मात्र, नंतरच्या काळात सुशिक्षितांचे प्रमाण अधिक अन नोकरीची उपलब्धता कमी अशी परिस्थिती निमर्रण होऊ लागली. त्यामुळे अनेकजण उच्च शिक्षित असतानाही पोलिस दलात शिपाई पदावर भरती होऊ लागले. तर काही तरुण आवड म्हणून पोलिस दलात येत आहेत. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, काही कारणास्तव ते शक्य न झाल्याने शिपाई पदावर भरती होतात. दरम्यान, भरती झाल्यानंतर काहीजण खात्यांतर्गत परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करत असल्याचे दिसून येते.

सध्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात एकूण दोन हजार ९०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, यातील दोन हजार ४६१ कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार ४६१ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल एक हजार ३०७ कर्मचारी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वकिली, बी.एड. एम. एड. यामधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांचाही समावेश आहे.

कामावर चांगला परिणाम
पूर्वी केवळ अधिकारीच उच्चशिक्षित असायचे. मात्र, आता कर्मचारीही उच्च शिक्षित असल्याने याचा पोलिस दलाला चांगला फायदा होत आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाज करणे आवश्यक आहे. अशा नवीन गोष्टी उच्चशिक्षित तरुणांना लवकर अवगत होतात. यासह अल्प शिक्षित व उच्च शिक्षितांच्या वर्तणुकीतही मोठा फरक असतो. यामुळे उच्च शिक्षितांमुळे कामावर चांगला परिणाम जाणवतो.

वाढती बेरोजगारी
सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नाहीत. यामुळे अनेकजण बेरोजगार आहेत. काही जणांनी व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. अशावेळी उच्च शिक्षण घेतलेले असले तरी अनेकजण पोलिस दलात शिपाई पदावरही भरती होण्याची तयारी दर्शवीत असल्याचे दिसून येते.

अभ्यासिका उपलब्ध
पदवी घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी सुरू करतात. अशा तरुणांसाठी महापालिकेने अभ्यासिका उपलब्ध केल्या आहेत. निगडीतील यमुनानगर, चिंचवडमधील संभाजीनगर, चापेकर चौक, थेरगाव, सांगवी, भोसरी, कासारवाडी येथे या अभ्यासिका आहेत. याठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यासह मार्गदर्शनही केले जाते.

‘‘कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे २०१० मध्ये पोलिस दलात शिपाई पदावर भरती झालो. आताही खात्यांतर्गत परीक्षा देऊन अधिकारी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
- राजेश कोकाटे, पोलिस शिपाई

पद ७, ८, ९ वी १० वी पास ११ वी पास पदवी पदव्युत्तर एकूण

सहायक फौजदार ४४ २५५ ८५५ १२०७ १०० २४६१
हवालदार, नाईक
शिपाई.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half of the police force in Pimpri Chinchwad is highly educated