पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; कोणकोणत्या भागात पाणी साचलं पाहा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

  • ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 

पिंपरी : रविवार सुटीचा दिवस. काही जण खरेदीसाठी, तर काही जण नातेवाइकांच्या भेटीसाठी घराबाहेर पडलेले. सायंकाळी घराकडे परतण्याची वेळ. पण, त्याच वेळी आकाशात ढग दाटून आले आणि धो-धो बरसले. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर परिसरात दिवसभर कडाक्‍याचे ऊन होते. मात्र, दुपारी चारच्या सुमारास काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. अर्ध्या तासातच पावसाने विश्रांती घेतली. आकाशही निरभ्र झाले. मात्र, साडेपाचच्या सुमारास पुन्हा ढग दाटून आले. साडेसहालाच अंधार पडला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. पथदिवेही बंद पडल्याने वाहनचालकांना समोरील रस्ताही दिसत नव्हता. त्यामुळे अनेकांनी रस्त्याच्या कडेला वाहन उभी केली. दुचाकी चालकांनी रेनकोट असतानाही उड्डाणपूल, भुयारी मार्ग व ग्रेडसेपरेटरचा आसरा घेतला. सुमारे तासाभराने पावसाचा जोर ओसरला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, रविवार सुटीमुळे खरेदी व अन्य कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली. दापोडी ते निगडी या ग्रेडसेपरेटरमध्ये ठिकठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. निगडीतील टिळक चौक, काळभोरनगर, वल्लभनगर भुयारी मार्ग, चिंचवड स्टेशन येथील सेंट मदर टेरेसा पुलाखालील सेवा रस्ता, कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग, पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी- लांडेवाडी प्रवेशद्वाराजवळ, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ, पीसीएमसी चौक, सीएमई भिंतीजवळील गंगोत्री पार्क, तसेच हिंजवडी येथे फेज दोनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. 

हिंजवडी आठवडे बाजारात त्रेधा 

हिंजवडी येथील आठवडे बाजार असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची व व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. जोरदार वारा व वीजपुरवठाही खंडित झाल्याने अडचणीत भर पडली. दरम्यान, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी महापालिकेची कामे सुरू असून, खोदकाम केले आहे. या खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खोदकामाचा राडारोडा रस्त्यावर पसरून चिखल झाला होता. तसेच, पाऊस सुरू होताच शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यानंतर तो सुरळीत झाला. काही भागात मात्र, रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Pimpri Chinchwad city on sunday 20 september 2020