
हिंजवडी आयटीत शेकडो मोठाल्या गृह प्रकल्पांची कामे जोरावर आहेत. मुबलक पाण्याचे खोटे अश्वासन देऊन बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची फसवणूक करत आहेत.
Hinjewadi Water Issue : आयटीत घर घेताय? सावधान..!! पाणी देता का पाणी असे म्हणण्याची वेळ येऊ शकते?
- बेलाजी पात्रे
हिंजवडी - हिंजवडी आयटीत शेकडो मोठाल्या गृह प्रकल्पांची कामे जोरावर आहेत. या सदनिकांत राहायला येणाऱ्या रहिवाशांच्या पाण्याची कुठलीही ठोस तरतूद पीएमआरडीए प्रशासनाकडून किंवा खुद्द बिल्डरकडून होत नसूनही मुबलक पाण्याचे खोटे अश्वासन देऊन बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे आयटीतील सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा ताण स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर येत असून त्यांचीही मोठी दमछाक सुरू आहे.
आयटी हब अशी ओळख निर्माण झालेल्या हिंजवडी परिसरात देशाच्या काना कोपऱ्यातून नोकरीनिमित्त झपाटयाने येणाऱ्या आयटीयन्सना घरे देणारे असंख्य बांधकाम व्यावसायिक येथे उतरले. मात्र, प्रकल्पांतील रहिवाशांसाठी पाणी पुरवठ्याची कुठलीही ठोस उपाययोजना नसताना किंवा भविष्यातील पाणी योजना काय आहे या कुुठलीही पडताळणी न करता पीएमआरडीए प्रशासन डोळे झाकून परवानगी देत अब्जो रुपयांचा महसूल गोळा करत आहे. त्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे पाण्याविना व्याकूळ झालेल्या सोसायटीधारकांना पश्चाताप करण्याची वेळ आली असून टॅंकरवर लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
करोडो रुपयांची सदनिका घेताना टॅक्स देवूनही रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा मोठी किंमत मोजावी लागत आहे. या परिसरामध्ये टँकर लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने अनेक सोसाटींना महिन्याकाठी टँकर लॉबीवर लाखो रुपये मोजावे लागत आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून नियम डावलून प्रकल्पांची उभारणी होत आहे.पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा मुलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत. मोठाल्या टाऊनशीपमध्ये मैला शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) नसल्याने मैला विनाप्रक्रिया नदीत सोडले जाते त्यामुळे मोठे नदी प्रदूषण होत आहे.
सदस्याने झळकावले फलक
हिंजवडी परिसरात चालू असलेल्या गृह प्रकल्पांना ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याचा कोटा मंजूर नसताना बिल्डर लॉबी ग्रामपंचायतकडे बोट दाखवून पाणी पुरवठ्याचे खापर ग्रामपंचायत प्रशासनाच्या माथी फोडून ग्राहकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे सोसायटीधारकांचा लोंढा ग्रामपंचायतमध्ये घोंगावत आहे. इथून पुढे त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सदस्य विक्रम साखरे यांनी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या दर्शनी भागात या प्रकल्पांना ग्रामपंचायत पाणी देत नसल्याचे फलक लावल्याने हिंजवडीतील पाणी प्रश्न भविष्यात पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
करोडो रुपये खर्चून आम्ही वर्षापूर्वी इथे राहायला आलो २४ तास विविध सुविधेसह २४ तास पाणीही मिळणार असे आश्वासन बिल्डरने दिले होते मात्र, आमची निववळ फसवणूक झाली आहे सर्व काही टँकरवर अवलंबून आहे. टँकरचे पाणी कधी गढूल येते, कधी चिकट येते कधी उग्र वास येतो त्यामुळे अनेक व्याधी जडत आहेत. ८१५ सदनिकात आम्ही साडे तीन हजार नागरिक राहतो आमच्यासह आजूबाजूच्या सर्वच सोसायटिंची ही व्यथा आहे.
- रेखा तेलंग, रहिवाशी गोदरेज २४ सोसायटी
हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीत नवीन सुरू असलेल्या बांधकामांना पिण्याच्या पाण्याची सोय केल्याशिवाय परवानगी देऊ नये असा ठराव काही दिवसापूर्वी करण्यात आला होता. या सर्व प्रकल्पांना आमच्याकडे पाणी उपलब्ध नसल्याचा स्पष्ट उल्लेख असलेला दाखला आम्ही देतो तरीही बिल्डर लॉबी याकडे कानाडोळा करतात. मात्र, पिण्याच्या पाण्याची सक्षम सुविधा, रस्ते व अन्य मूलभुत सुविधा पुरविल्या शिवाय पीएमआरडीएने प्रकल्पांना परवानगी देऊच नये. मोघम परवानगी दिल्याने ग्रामपंचायतसह सर्वच सुविधांवर प्रचंड ताण येतो
- विक्रम साखरे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य हिंजवडी