
हिंजवडीत काँग्रेसकडून "महागाईची होळी "
हिंजवडी : अन्न-धान्य, गॅस, डिझेल, पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे सर्व सामान्य जनता होरपळत आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले असून या सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य नागरीक देशोधडीला लागल्याची आरोळी पिटवित केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात मुळशी तालुका काँग्रेसने सोमवारी (ता. ६) महागाईची होळी "पेटवुन भाजप सरकारचा निषेध केला.
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनानुसार हिंजवडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या निषेध आंदोलनाला मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव बुचडे, मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदिप साठे, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, हिंजवडी गावचे माजी सरपंच विशाल साखरे, म्हातोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संदिप साखरे, अंकुश मारणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य व केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेवर शिमगा करण्याची वेळ आली आहे. देशभरात महागाईचा भस्मासुर फोफावला आहे. इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेले. गॅसचे दर सहा महिन्याला वाढत आहेत. त्यामुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत देशात वाढत चाललेल्या महागाई विरोधात मुळशी तालुका काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी महागाईची होळी पेटवुन केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.
- गंगाराम मातेरे अध्यक्ष काँग्रेस कमिटी मुळशी