Video : काय सांगता, थर्माकोलपासून रुग्णालयातील खाट बनवलीय...कशी? वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

- पिंपरीतील उद्योजकाची भन्नाट कल्पना
- 'सकाळ'च्या बातमीतून प्रेरणा 

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक रुग्णालयांतील खाटा कमी पडू लागल्या आहेत. ही परिस्थिती अधिक वाईट होईल अशी भीती व्यक्त होत असतानाच पिंपरीतील एका उद्योजकाने अग्निरोधक थर्माकोलपासून खाट तयार केले आहेत. सहज हलवता येणारे आणि वजानाने हलके; पण अर्धा टन भारक्षमता असलेले ही खाट आहे. खाटा नसल्याने जमिनीवर झोपवून रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ‘सकाळ’मधील वृत्त वाचून त्यांना अशी खाट बनविण्याची कल्पना सूचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीमध्ये माने उद्योग समूह आहे. याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय कंपनीचे संचालक रामदास माने यांनी याबाबत ‘सकाळ’ला सांगितले. मुंबईमधील बऱ्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी खाटा नाहीत. सर्व रुग्णालये भरलेली आहे. त्यामुळे जमिनीवर झोपून उपचार करून घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे, अशी बातमी गेल्या आठवड्यात ‘सकाळ’मध्ये आणि ‘साम’ वाहिनीवर बघितली. खूप वाईट वाचले. अस्वस्थता वाढली. मुलगा राहुलबरोबर चर्चा केली. यातून लक्षात आले की, आपल्या कंपनीत तयार होणाऱ्या थर्माकोलचा उपयोग करता येईल. हे थर्माकोलचे ब्लॉक १२ फूट लांब, ४ फूट रूंद व दोन फूट उंच असतात. त्यातून ‘इमर्जन्सी बेड’ तयार होईल का, याविषयी गेल्या आठवड्यात संशोधन सुरू केले. चार दिवसांपूर्वी महापलिकेने कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आम्ही बापलेकाने दोन हेल्पर घेऊन कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा हा थर्माकोल ब्लॉक ट्रीम करून घेतला. नंतर रुग्णालयातील खाटांच्या आकाराप्रमाणे मार्किंग केले आणि त्याप्रमाणे थर्माकोल ककट करून खाट एका तासात तयार केली. 

असा आहे थर्माकोल 
- अग्निरोधक क्षमता या टीफ ग्रेड थर्माकोलमध्ये आहे. 
- उपलब्ध थर्माकोलच्या तुलनेत अतिशय वेगळा 
- शंभर टक्के पुनर्वापर करता येतो. 
- बुरशी, गंध आणि चवविरहित 
- फार्मास्युटिकल उत्पादनांमध्ये वापर 
- नरम असल्याने धक्के सहन करण्याची क्षमता 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खाटेची वैशिष्ट्ये 
- आकार ः ६ फूट लांब, अडीच फूट रूंद व २ फूट उंच 
- वजन ः ८ किलो आहे. 
- एकाचवेळी दहा लोक उभे राहण्याची क्षमता 
- स्वच्छता सहज करता येते 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शौचलयाचीही निर्मिती 
या उद्योगसमूहात थर्माकोलसाठीची सर्व प्रकारची यंत्रसामुग्री बनवणे आणि थर्माकोलचे उत्पादन होते. याची निर्यात जगातील ४५ देशांना निर्यात होते. या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून आजवर पन्नास हजार शौचालये बनविली आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या सासरी शौचालय नसेल तर लग्नात आहेर म्हणून हे शौचालय कंपनीतर्फे मोफत दिले जाते.  

सामाजिक बांधिलकी म्हणून आवश्‍यकता असलेल्या रुग्णालयांना ना नफा, ना तोटा या तत्वावर अत्यल्प किंमतीत खाटा पुरविण्याचा आमचा मानस आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला खाट नसल्यामुळे जमिनीवर झोपावे लागणार नाही, इतकी निर्मिती करून ठेवणार आहे. 
- रामदास माने, माने उद्योग समूह 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospital beds made from thermocol at pimpri chinchwad city