वाढत्या महागाईत १२ हजार पगारावर घर कसे चालवायचे? : महिला वाहक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st buses

वाढत्या महागाईत १२ हजार पगारावर घर कसे चालवायचे? : महिला वाहक

पिंपरी ः नोकरी सांभाळून संसार करायचा, त्यात कमी पगारावर गरजा कशा भागवायच्या? या कात्रीत एसटीच्या महिला कर्मचारी सापडल्या आहेत. वाढत्या महागाईत अवघ्या १२ हजारांच्या पगारावर घर कसे चालवायचे, या विचाराने थकल्याने १५ दिवसांपासून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. गेल्या १०-१५ वर्षांपासून काम करूनही हाती पगार फक्त १४ हजारच. त्यात भागविणे मेटाकुटीला आल्याने त्या संपात सहभागी झाल्या आहेत. मात्र, अपुऱ्या वेतनामुळे भरडल्या गेलेल्या या महिला कर्मचाऱ्यांची तिहेरी कसरत सुरू झाली आहे. यातून काहीतरी निर्णय व्हायलाच हवा, अशी अपेक्षा आंदोलक महिला वाहकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या आहेत.

महिला वाहक म्हणून एसटी महामंडळात महिलांची झालेली भरती हा राज्यासाठी अभिमानाचा विषय होता. आंदोलनात आघाडीवर असलेल्या या महिला कर्मचारी निलंबनाची टांगती तलवार डोईवर असतानाही यात लढताना दिसत आहेत. वल्लभ नगर आगारात २९ महिला कर्मचारी आहेत. त्यात लिपिक, मेकॅनिक, वाहतूक नियंत्रक यांचा समावेश आहे. आगाराबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. कुणी आले की ताकद एकवटून घोषणा देत, त्या १६ दिवसांपासून आंदोलन धगधगत ठेवत आहेत. ‘‘ऑफ द रेकॉर्ड’ त्यांची गाऱ्हाणी सांगतात. मात्र, काहीजणी निलंबनाच्या भीतीमुळे प्रतिक्रिया देण्यास घाबरत आहेत.

सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करा

चिंचवडगावात परिसरात राहणाऱ्या अश्‍विनी गायकवाड या बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपात पहिल्या दिवसांपासून त्या सहभागी आहेत. गेल्या बारा वर्षांपासून या सेवेत असून १५ हजार रुपये प्रतिमाह वेतनावर त्या काम करीत आहेत. पगार वेळेवर न ‌झाल्याने अनेक आर्थिक, कौटुंबिक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचे म्हटले, तर पैसा कोठून आणावा हा प्रश्‍न आहे. यावर्षी मुलगा दहावीत पण त्याच्याकडे लक्ष देता येत नाही. सकाळ नाश्‍ता, दुपारचा स्वयंपाक तयार करून संपात सहभागी होत आहे. कारण, आता उसनवार, तडजोड करीत संसार करून थकवा आला आहे. त्यामुळे शासनाने राज्य सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला घोषित करावे. त्याप्रमाणे भत्ते, वेतन सवलती द्याव्या, अशी मागणी त्या शासनाकडे करीत आहेत.

हेही वाचा: कंगणाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल; शेतकऱ्यांना 'खलिस्तानी' ठरवणं भोवलं

प्रपंच चालवायचा कसा?

२०११ साली १३ हजार रुपयांवर कंडक्टर म्हणून रुजू झालेल्या निलम कदम यांचा पगार १० वर्षांनंतर १७ हजार रुपये झालाय. या पगारात प्रपंच चालवायचा कसा हा त्यांच्यापुढचा प्रश्‍न आहे. घरभाडे जाते आणि किराणा, सिलिंडर, भाजीपाला यात उरलेला पगार संपतो. दहा वर्षाच्या मुलीसह तीन जणांचे कुटुंब. लोकांना वाटते, एस. टी. कर्मचारी हे तर सरकारी नोकर, पण एवढा कमी पगार हे कुणालाच माहीत नाही. एस. टी. प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याचे त्यांना भय वाटत नाही. त्या म्हणतात, काम करून उपाशीच रहावे लागते, त्यापेक्षा आंदोलनामुळे होणारी उपासमार पत्करली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे, कारण, कमी पगारामुळे होणाऱ्या ससेहोलपटीची झळ सगळ्यांनाच बसत असल्याचे त्या सांगतात.

आता नाही बोलायचं तर कधी?

२० वर्षे वाहतूक नियंत्रकाची सेवा करून ३० हजार पगार. सरकारी नोकरी असून समाधान नाही. अशा प्रतिकूल परिस्थिती काम करूनही अपुरा पगार ही त्यांची व्यथा असल्याचे वाहतूक नियंत्रक शैलजा माळी सांगतात. ‘आता नाही बोलायचं तर कधी?’ या धैर्याने त्यांची लढाई सुरूच आहे. महागाईच्या काळात कुटुंबाची परिस्थिती कशी सांभाळणार या मोठ्या प्रश्नाने त्रस्त झाल्याने आंदोलनात सहभागी झाल्याचे विजयमाला इबीतवार सांगतात. त्यांना कमी अंतराच्या मार्गाऐवजी नियुक्त न करता लांब पल्लय़ाच्या मार्गावर काम दिले आहे. तसेच तुटपुंज्या वेतनामुळे रोजच अडचणींचा सामना करावा लागतोय, याचा तणाव असह्य होत असल्याचे वाहक हसीना शेख सांगत होत्या.

loading image
go to top