वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी; जगताप डेअरी चौकातील ग्रेडसेपरेटर झाला खुला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

  • नाशिक फाटा-वाकड-हिंजवडी बीआरटीएस मार्गावरील वाहतूक सुरळीत 

पिंपरी : नाशिक फाटा-वाकड आणि औंध-रावेत या बीआरटीएस रस्त्यांना जोडणाऱ्या साई चौकातील (जगताप डेअरी चौक) ग्रेड सेपरेटर गुरुवारपासून वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे नाशिक फाटा-वाकड मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

पिंपरी-चिंचवड : यंदा गणेशोत्सवात हे महत्त्वाचे 'संस्कार' नागरिकांमध्ये रूजवले जातायेत

'डोळे शिणले, तरी न्याय मिळेना'; गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांची व्यथा

साई चौकातून पिंपळे सौदागर, पिंपरी, पिंपळे गुरव, कासारवाडी, भोसरी, नाशिक महामार्ग, मुंबई महामार्ग, वाकड, हिंजवडी, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग, काळेवाडी फाटा, थेरगाव, चिंचवड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी, सांगवी, औंध व पुणे आदी भाग दोन्ही बीआरटीएस मार्गामुळे जोडले गेले आहेत. मात्र, हिंजवडी आयटी पार्क, भोसरी एमआयडीसी, पिंपरी कॅम्प व पुण्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी औंध-रावेत मार्गावर नवनगर विकास प्राधिकरणातर्फे दोन समांतर उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र, नाशिक फाटा-वाकड-हिंजवडी मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन वर्षांपासून ग्रेडसेपरेटरचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोकणे चौक व विशालनगरमार्गे वळविण्यात आली होती. परिणामी वेळ व इंधन अधिक लागत होते. आता ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण झाल्याने दोन्ही बीआरटी मार्गांवरील रहदारीची समस्या सुटणार आहे. ग्रेडसेपरेटर उभारणीसाठी 28 कोटी 36 लाख रुपये खर्च झाला आहे. 

भाजप-राष्ट्रवादी दिलजमाई 

औंध-रावेत मार्गावरील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन कोणी करावे? यावरून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मतभेद होते. भाजपने उद्‌घाटन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता बंद केला होता. काही महिन्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, ग्रेडसेपरेटरच्या उद्‌घाटनाला दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर उषा ढोरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, नगरसेविका ममता गायकवाड, आरती चोंधे, शीतल काटे आदी पदाधिकाऱ्यांसह सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jagtap dairy chowk grade separator open on thursday 27 august 2020