'या' महिलेच्या धैर्याला मानलं, लॉकडाउन शिथिल झाल्यावरही जगण्यासाठी करतेय ही धडपड

'या' महिलेच्या धैर्याला मानलं, लॉकडाउन शिथिल झाल्यावरही जगण्यासाठी करतेय ही धडपड

जुनी सांगवी (पुणे) : कोरोनाच्या संकटात कष्टकरी, घरेलू कामगार पुरता पिचला आहे. कडक टाळेबंदीत त्यांनी कसाबसा तग धरला. मात्र, टाळेबंदी काही नियम व अटी घालून शिथिल झाल्यावर परिस्थिती पूर्वपदावर येईल, या आशेवर घरकामगार, बांधकाम मजूर, फेरीवाले, असंघटीत संपूर्ण कामगार वर्ग आशादायी होता. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यावर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतच चालल्याने या सर्व वर्गासमोर संसाराचा गाडा हाकण्याची यंत्रणाच पुरती कोलमडली आहे. यात भाड्याने राहणारी मंडळी थकलेले घरभाडे, लॉकडाउन काळातील न मोजलेले व न भरलेले विजबिल अशा आर्थिक कोंडीत सर्वसामान्य भरडला जात आहे. घरभाडे, वीजबिल, रेशन अशा समस्यांनी सर्वसामान्य मेटाकूटीस आला आहे. टाळेबंदीत पुढे आलेले मदतीचे हातही आता थांबले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे, अशीच जगण्याची लढाई लढत असलेल्या जुनी सांगवी येथील करिअम्मा हिच्या संघर्षाला तोड नाही.

मुळ कर्नाटक राज्यातील करिअम्मा जुनी सांगवी येथील मुळा नदीकिनारा परिसरातील झोपडीवजा पत्राशेडमध्ये वास्तव्यास आहेत. करिअम्मा या सांगवीतील लहानग्यांसह मोठ्यांना परिचित आहेत. एका अपघातात उजवा हात गमावल्यापासून उद्यानाबाहेर गोळ्या बिस्किट, चणे, फुटाणे, रानमेवा विकणारी करिअम्मा संसाराचा गाडा हाकण्यासाठी आजही उद्यानाबाहेर उभी आहे. कडक टाळेबंदीत हे काम थांबल्याने तिने या काळातही कुणापुढे मदतीचा हात न पसरता तिथेच पदपथावर कांदे, बटाटे विकून कडक टाळेबंदीत कुटूंबाचा गाडा हाकला. टाळेबंदीनंतर सर्व परिस्थिती पुन्हा स्थिरस्थावर होईल, या आशेवर तग धरली. पुन्हा शाळेचा किलबिलाट सुरू होईल, उद्याने हसण्या बागडण्याने बहरतील एक-एक रुपया घेऊन रानमेवा, चणे, फुटाणे घेण्यासाठी तिचा ग्राहक परत येईल, ही तिच्या मनी आशा होती. मात्र, या आशेवर पाणी पडले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन हा नियम व अटीनुसार शिथिल झाल्यावर ना शाळा सुरू झाल्या ना उद्यानातील किलबिलाट वाढला. वाढला तो कोरोनाचा संसर्ग. यामुळे तिच्यासारख्या अनेक कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष मात्र, वाढला आहे. उद्यानाबाहेर रस्त्यावर पुन्हा गोळ्या बिस्किटाचे दुकान थाटलेल्या करिअम्माकडे ग्राहक फिरकतच नाही. तो कोरोना संकटामुळे घरातच अडकला आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून करिअम्मा बांधकाम मजूर म्हणून काम करत होती. जसा काही मजूरी कष्ट हा पिढीजात तिच्या पाचवीलाच पुजलेला. तिलाही शिकायचं होत. पण शिकता आलं नाही. दोन मुले, एक मुलगी व पती असे तिचे कुटुंब. पतीही बांधकाम मजूर आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी मोशी येथील एका बांधकाम साईटवर काम करताना झालेल्या अपघातात तिला उजवा हात कोपरापासून गमवावा लागला. यातून सावरत ती हात गमावल्याने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी उद्यानाबाहेर रानमेवा, चणे, फुटाणे विकुन सुरुवात केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजवर जेमतेम चाललेले असताना कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा ही घडी विस्कळीत झाली. लॉकडाउन काळात ई-सकाळ बातमीच्या माध्यमातून करिअम्माची माहिती  समोर येताच स्थानिक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांकडून तीन महिन्याची जीवनावश्यक साहित्याची मदत झाली. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यावर पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होईल, या आशेवर उद्यानाबाहेर करिअम्माने पुन्हा गोळ्या बिस्किटे, रानमेवा विकण्याचे पदपथावर दुकान थाटले आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने उद्याने ओसाड, शाळा बंद, चिमुकली घरातच अडकल्याने धंदा होत नाही. यातून सावरायचे कसे, असा प्रश्न करिअम्मासमोर सतावतो आहे. मात्र तिच्या जगण्याच्या लढाईला तोड नाही. तिचा संघर्ष सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com