Pimpri : आळंदीत २६ नोव्हेंबरपासून कार्तिकी वारी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alandi

आळंदीत २६ नोव्हेंबरपासून कार्तिकी वारी सोहळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर कालावधीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी होणार आहे. यासाठी तयारी करण्याचा आदेश प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर आळंदी देवस्थान आणि प्रशासकीय कार्यालयांना आज दिला.

कोरोना रुग्णांची शक्यता गृहित धरून वारी काळात भाविक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन पातळी तपासणी केली जाणार आहे. आळंदीत यात्रा भरविण्याबाबत शासन मंजुरी देण्याची पूर्ण शक्यता गृहीत धरून प्रशासन तयारीला लागले. आळंदी पालिकेने वारीसाठी शहर स्वच्छता, मोबाईल टॉयलेट, महिलांना कपडे बदलण्याची व्यवस्था, शहर निर्जंतुकीकरण, पाण्याचे टॅंकर, चोवीस तास पाणी पुरवठा, अतिक्रमण विरोधी कारवाई यासारखी कामे यात्रेपूर्वीच करायची आहेत.

महावितरणने यात्राकाळात चोवीस तास वीजपुरवठा करायचा आहे. आळंदी पोलिसांनी वारीच्या काळात दिंड्यांच्या वाहनांना पास देणे, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करून पुरेसा बंदोबस्त ठेवायचा आहे. ग्रामिण रुग्णालयाने जादा कर्मचारी नेमून चोवीस तास ग्रामिण रुग्णालयाबरोबरच मंदिर, इंद्रायणी घाटावरही आरोग्य सेवा पुरवायची आहे. कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यास शहरातील खासगी रूग्णालयात व्यवस्था करणे, कर्मचारी व भाविकांचे थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक केले आहे.

पीएमपीएल आणि एसटी महामंडळाच्या जादा बसेस ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाविक व जादाच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग :

  1. पालिकेकडून दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा

  2. यात्रेपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई

  3. वारीकाळात चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी

  4. दिंड्यांच्या वाहनांना पोलिसांकडून प्रवेश पास

  5. भक्ती सोपान पुलाची दुरुस्ती

  6. इंद्रायणीपात्रात वडिवळे धरणातून पाणी

आळंदी देवस्थानकडून चोपदार बंधूंचे निलंबन

आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आळंदी देवस्थानचे मानकरी राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांच्यावर देवस्थानच्या विश्वस्त कमिटीने कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाईमुळे चोपदार बंधूंच्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरातील व पालखी सोहळ्यातील सर्व सेवा बंद झाल्या आहेत.

यापुढील काळात चोपदारकीची सेवा बाळासाहेब चोपदार यांच्याकडे राहणार आहे. गत तीन-चार वर्षांत चोपदार बंधूंबाबत विविध तक्रारींचा विचार करता कारवाई केल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

loading image
go to top