खवय्यांनो, मावळच्या 'या' डोंगरी मुठ्याची चव कधी चाखलीय का?

रामदास वाडेकर 
Monday, 28 September 2020

  • कोरोनाच्या काळातही किवळेतील नागरिकांची खेकडे पकडण्यासाठी धडपड 

कामशेत : "डोंगर मुठ्यांचा (खेकड्यांचा) रस्सा आणि नाचणीची भाकरी याची चव लयच न्यारी, म्हणून मुठे आणायला पाच किलोमीटर डोंगराची चढण चढून वर गेले. तेवढीच उतरून खाली आले. या मुठ्यांची चव तुमच्या मटणाला, चिकनला नाही. मुठ्यांचा शिळा रस्सा खाल्ल्यावर तोंडाला पाणीच येईल," असे किवळेतील बासष्ट वर्षीच्या चांगुणाबाई लोटे सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मीच काय आमच्या गावातील कित्येक बाया अन्‌ बापे जोनूबाईचा डोंगर चढून पार गडदच्या माळात मुठे गिरवायला जातो. गवताच्या गराठीने जमिनीवर पडलेल्या बिळातून मुठे गिरवायचा, वर येताच चपळाईने पकडून पोत्याच्या पिशवीत टाकायचा. एकदा मुठ्या पिशवीत पडला की काळजी मिटली. त्याला घरी आणून सोलायचा, नांगे, कुड्या आणि पेंधा वेगळा करून स्वच्छ धुवायचा. मस्त फोडणी देऊन तिळाचा कूट टाकायचा अन्‌ रस्सा गार किंवा गरम कसाही नातवंडांना खायला वाढायचा. एकापेक्षा एक वरचढ झालेली नातवंडे दीड-दोन भाकरी सहज कुस्करून त्यावर ताव मारल्यात, असे जनाबाई लोटे म्हणत होत्या. कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला डॉक्‍टरांनी अंडी, मटण, चिकन, मासे खाण्याचा सल्ला दिला आहे. खेडोपाडी शेतकरी आणि शेतमजुरांना वारंवार चिकन, मटण विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्याला खेकड्यांचा रस्सा हा पर्याय असल्याने खेकडे पकडायला आम्ही घराबाहेर पडतो.  दसऱ्याच्या पूर्वीच हा रस्सा खाण्याची वेगळीच चव असल्याचे बाळू मदगे यांनी सांगितले. 

निगडीतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा; स्थानिक रहिवाशांकडून आंदोलन

अरुणा म्हेत्रे सांगत होत्या, "गावातील बऱ्याच बायका ऐकीमेकींच्या सोबतीने सकाळी दहाच्या सुमारास निघतो. अनवाणी पायाने चालत जातो. शिवारातील मुठ्यापेक्षा डोंगरावरील मुठ्यांना चव चांगली आहे. त्यात भरपूर पौष्टिक तत्त्व आहे, ते शोधताना जिवाची पर्वा करीत नाही. गवतात कुठेही पाय पडतो. विंचूकाट्याची भीती राहत नाही. गराठीने गिरवून मुठ्या पकडायचा एवढ्या वर लक्ष असते. एकदा मुठे आणल्यावर दोन वेळचे कालवण होते."

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गणपत पिचड व मधुकर मदगे म्हणाले, "कातकरी समाज बांधव नदी ओढ्यात खेकडे पकडून कामशेतच्या बाजारपेठेत विकतात. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, नोकरदार दोनवेळचे कालवण होईल, या अपेक्षेने रानावनात फिरून खेकडे, मुठे पकडून आणतो. त्यासाठी त्याला दुचाकीवरून जावे लागत नाही की चार पैसे मोजावे लागत नाही. कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. दहा किलोमीटरची पायपीट करून कधीकधी रिकाम्या हाताने यावे लागते. २५ गावांतील ५०० महिला-पुरुष खेकडे पकडायला जातात. दोन महिने हंगाम. विक्रीपेक्षा घरी वापरणाऱ्या भर देतात. भाजी कडधान्याच्या खर्चात बचत होते."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kiwale citizens struggled to catch crabs during corona periods