esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये विधानपरिषद निवडणुकीचं वातावरण तापतंय; उमेदवार शहरात ठाण मांडून 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानपरिषद निवडणुकीचं वातावरण तापतंय; उमेदवार शहरात ठाण मांडून 
  • पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रतिनिधी शहरात; नातेवाईकही प्रचारात 

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानपरिषद निवडणुकीचं वातावरण तापतंय; उमेदवार शहरात ठाण मांडून 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण शहरात कधी नव्हे इतके तापू लागले आहे. उमेदवारांनीही मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधी शहरात ठाण मांडून आहेत. 

धक्कादायक : पिंपरीत बांधकाम सुरू असताना कोसळला स्लॅब

पिंपरीत  पोलिस निरीक्षकांच्या अवघ्या सात दिवसांत पुन्हा बदल्या 

गेल्या पाच-सहा वर्षात शहराची लोकसंख्या वाढली आहे. पर्यायाने, पदवीधरांची संख्याही वाढली आहे. तसेच, खासगी शाळांसह शिक्षकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढली आहे. या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदार होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, आम आदमी पक्षानेही मतदार नोंदणीचे आवाहन केले होते. भाजपने स्वतंत्र यंत्रणा राबवली. सुमारे अठरा हजार पदवीधरांची नोंदणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, त्यांचे मतदानात किती रूपांतर होते?, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

नातेवाईक प्रचारात 

एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचे बंधू सध्या तळ ठोकून आहेत. त्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांसह पदवीधर मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. अन्य प्रमुख उमेदवारांनीही प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. मतदानासाठी केवळ दहा दिवस बाकी असल्यामुळे प्रचारात रंगत येत आहे. एका अपक्ष उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. त्यांना एका आमदाराची साथ असल्याची चर्चा आहे. शिवाय, मतदारसंघातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकही शहरात राहात आहेत. त्यांच्या मार्फत प्रचाराची संधी काही उमेदवार साधत आहेत. 

पूर्व इतिहास बोलका 

पुणे पदवीधर मतदारसंघाचे एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने यापूर्वी सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे पक्षाला उमेदवार बदलावा लागला आहे. शिवाय, गाव ते शहर पातळीवरील स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून त्या पक्षाची मतदारसंघावर पकड असल्याची, त्यांची संघटन यंत्रणा सक्रिय असल्याची आणि दोन वर्षांपासून तो पक्ष तयारी करीत असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे. 

आजची सर्वसाधारण सभा रद्द 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता दोन नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागल्यानंतर आचारसंहिता शिथिल होणार आहे. मात्र, आचारसंहितेमुळे महापालिका पदाधिकाऱ्यांची वाहने तूर्त काढून घेण्यात आली आहेत. आजची (ता. 20) सर्वसाधारण सभाही रद्द केली आहे. गेल्या दोन आठवड्यात स्थायी समिती सभाही झालेली नाही. अन्य विषय समित्या व प्रभाग समित्यांचे पदाधिकारी व अध्यक्षांची नुकतीच निवड झाली आहे. स्थायीच्या पुढच्या आणखी दोन सभा होणार नाहीत, अशी स्थिती आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नसल्याची खंत महापालिका पदाधिकारी, अधिकारी व्यक्त करीत आहेत.