Water Tourism Place : वाढता उन्हाळा आणि सुटीच्या पार्श्वभूमीवर मावळमधील जलपर्यटनस्थळांना पसंती lonavala summer holiday maval Water Tourism Place preference | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water tank lonavala

Water Tourism Place : वाढता उन्हाळा आणि सुटीच्या पार्श्वभूमीवर मावळमधील जलपर्यटनस्थळांना पसंती

लोणावळा - वाढता उन्हाळा आणि सुटीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळा परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट, खासगी बंगले जवळपास फुल्ल झाले आहेत. पुढील महिनाभरातील शनिवार व रविवारचे बुकिंग शंभर टक्के झाले असून, उकाड्यामुळे हैराण झालेल्या पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात मावळच्या दक्षिण पट्ट्यातील पवना धरण परिसराला पसंती देत आहेत. कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वॉटर पार्क, बोटींग क्लबसह लोणावळ्याजवळील खासगी जलक्रिडेची ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने फुल्ल होत आहेत.

बोरघाटात वाहनांच्या रांगा

सुट्यांमुळे विकेंडला मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडत असल्याने बोरघाटात पर्यटकांच्या वाहनांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आडोशी बोगदा ते खंडाळा बोगद्यादरम्यान ब्लॉक घेत वाहतूक वळविल्याने लांब रांगा लागल्या. शनिवारी दिवसभर द्रुतगती मार्गावरील पुणे व मुंबई बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सावधानता गरजेची

कडक उन्हाळ्यामुळे पाणवठ्याच्या ठिकाणी पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अतिउत्साहामुळे पवना धरण, आंद्रा, मुळशी, कासारसाई धरणासह खासगी जलतरण तलावांत बुडून अनेकांना जीव गमवावे लागले आहे. त्यामुळे पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटताना स्वतःहून खबरदारी घेणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी खासगी नौकानयनाची ठिकाणे, हॉटेल्स व रिसॉर्टमधील जलतरण तलावाची ठिकाणे जीवरक्षक नेमण्याची गरज आहे. जीवरक्षक नसलेल्या ठिकाणी तसेच पाण्याचा अंदाज, खोली माहीत नसलेल्या ठिकाणी पाण्यात उतरणे टाळणे गरजेचे आहे.

कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वॉटर पार्क, बोटिंग क्लबसह खासगी वॉटर पार्कच्या ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहेत. जलविहारास पसंती देत असल्याने ‘एमटीडीसी’मधील नौकानयन केंद्रामध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

- सुहास पारखी, व्यवस्थापक, एमटीडीसी

पर्यटकांमुळे सध्याचा विकेंड फुल्ल गेला. पुढील आठवडाभरात पर्यटकांची वर्दळ कायम राहण्याची शक्यता असून, येथील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्ट्सचे महिनाभरातील शनिवार व रविवार या दोन दिवसांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

- अनिश गणात्रा, हॉटेल व्यावसायिक

कार्ला परिसर परिसर अतिशय शांत ठिकाण आहे. येथील निवांतपणा अनुभवण्यासाठी आम्ही दरवेळी येथे येत असतो.

- मुकेश पाटील, पर्यटक, ठाणे

मावळ गड-किल्ले, लेणी तसेच धरणाचा भाग समृद्ध आहे, या भागाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. एक-दिवसासाठी भटकंतीची आवडती ठिकाणे आहेत.

- समाधान काळे, पर्यटक, पुणे

पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा मात्र, अनुचित प्रकार टाळण्यासाठी स्वतःहून खबरदारी घ्यावी. नियमांचे काटेकोर पालन करावे.

- सत्यसाई कार्तिक, सहायक पोलिस अधीक्षक

हेल्पलाइन

लोणावळा शहर पोलिस स्टेशन

०२११४-२७३०३३,२७३०३६

शिवदुर्ग मित्र: ९८२२५००८८४