
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी गुरुवारी (ता. १०) प्रथमच एकत्र आले.
पिंपरी महापालिकेची निवडणूक भाजप विरोधात महाविकास आघाडी?
पिंपरी - राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील घटक पक्ष काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेनेचे (Shivsena) शहरातील पदाधिकारी गुरुवारी (ता. १०) प्रथमच एकत्र आले. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कारभाराविरुद्ध प्रथमच एकत्रित पत्रकार परिषद त्यांनी घेतली. शिवाय, शनिवारी (ता. १२) पिंपरीत जनतेची महासभाही बोलावली आहे. या निमित्ताने महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होईल, असे संकेत मिळत आहेत.
महापालिकेची मुदत १३ मार्च रोजी संपत आहे. १४ मार्चपासून प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील कारभार पाहणार आहेत. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यापूर्वी पंधरा वर्ष म्हणजे २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. कॉंग्रेस विरोधी पक्षात होता. शिवसेनेची सदस्यसंख्या दोन अंकी होती. त्यांच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ बोटावर मोजण्याइतकेच होते. २००२ पूर्वी १९८७ पासून कॉंग्रेसच्या हाती महापालिकेचा कारभार होता. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्ष आहे. शिवसेनेचे अवघे नऊ सदस्य आहेत. कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. ही सल तीनही पक्षांना आहे.
हेही वाचा: पिंपरी-चिंचवड : झोपडीधारकांसाठी राजा झाला उदार!
आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढल्यास मतांची विभागणी होऊन भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतो. त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्याचेच संकेत गुरुवारी दिसून आले. भाजपच्या महापालिकेतील कारभाराविरुद्ध महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शनिवारी जनता महासभाही आयोजित केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे तीनही पक्ष एकत्रितपणे रणनीती ठरवतील असे दिसते. यापूर्वी महापालिकेतील कारभार असो की नागरी समस्या याविरुद्ध तीनही पक्ष स्वतंत्रपणे आंदोलने करायची. त्यांचा फारसा प्रभाव पडताना दिसत नव्हता. पण, आगामी काळात राजकीय समीकरणे कसे असतील? हे आगामी काळातच कळणार आहे.
महाविकास आघाडी...
जमेच्या बाजू...
भाजपविरुद्ध एकत्र सभा, आंदोलने करून दबावगट
कार्यकर्त्यांची संख्या वाढून निवडणुकीसाठी उपयोगी
प्रचारसभांना नेते व वक्त्यांची संख्या अधिक असेल
भाजपतून येणाऱ्यांमुळे संभाव्य विजेता उमेदवार मिळतील
कमकुवत बाजू...
गेल्या निवडणुकीतील मतांचा विचार करता वादाची शक्यता
जागा वाटपावरून इच्छुकांचे रुसवे-फुगवे वाढणार
जागा कमी व उमेदवार जादा होऊन बंडखोरीची शक्यता
भाजपतून येणाऱ्यांना की निष्ठावंतांना प्राधान्य देण्यावरून पेच
हेही वाचा: भक्ष्याच्या शोधातच बिबटे हिंजवडी आयटीत
भारतीय जनता पक्ष...
जमेच्या बाजू...
भाजप सोडून जाणाऱ्यांमुळे नवीन इच्छुकांना संधी
महाविकास आघाडीच्या तुलनेत इच्छुकांतील स्पर्धा कमी
जागा अधिक मिळत असल्याने बंडखोरीची शक्यता कमी
रिपब्लिकन पक्षाची (आठवले गट) साथ मिळणार
कमकुवत बाजू...
भाजप सोडून जाणाऱ्यांमुळे पक्षाला गळती लागल्याचे चित्र
विरोधक पाच वर्षांतील कामकाजावर दोषारोप करू शकतात
स्वपक्षातील नाराजांची समजूत काढावी लागणार
महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी व्यूहरचना आखावी लागणार
Web Title: Mahavikas Aghadi Against Bjp In Pimpri Municipal Corporation Election Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..