'पिंपरी-चिंचवडमध्ये संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी टीम तयार करा', महापौरांनी दिल्या सूचना

टीम ई सकाळ
Thursday, 25 June 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तपासण्या लवकर होणे आवश्यक आहे. कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय आठ स्वतंत्र टीम तयार करण्याची सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला गुरुवारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये आज ८९ नवे पॉझिटिव्ह

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेत गुरुवारी महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेते व अधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचा आढावा घेत विविध सूचना केल्या.

‍शहरामध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारने 17 मेपासून लॉकडाउन शिथिल केले. त्यानंतर दुकाने, इंडस्ट्रीज व इतर आस्थापना उघडण्याच्या सवलती देण्यात आल्या. यामुळे नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने तेव्हापासून पूर्वीच्या तुलनेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडकरांसाठी जून ठरतोय सगळ्यात धोकादायक; रुग्णवाढ अन् मृत्यूदर पाहाच

महापालिकेच्या वतीने शहरात ११ ठिकाणी कोविड केअर सेंटर व चार ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय सरकारच्या निर्देशानुसार शहरातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड नियंत्रित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी नव्याने संशयित रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन डेंटिस्ट, दोन संगणक ऑपरेटर, एक नर्स व एक मदतनीस यांचा सहभाग असणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एक रुग्णवाहिका व कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी एक वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आणखी वाचा- पिंपरी कॅम्प बंदचा निर्णय कायम, आता 'या' तारखेपर्यंत राहणार बंद

या आठ टीम महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कार्यरत असणार आहेत. तसेच येत्या आठ दिवसांमध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे देखील स्वॅब टेस्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे आठ क्षेत्रिय कार्यालयानुसार कोरोना संदर्भात कामकाजाची विभागणी केल्यामुळे एकट्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, कोरोना संदर्भातील स्थानिक स्तरावर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार आठही क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रुग्ण तपासणी व कंटेनमेंट झोन निश्चित करणे, कंटेनमेंट झोन रद्द करणे ही सर्व कामांना गती मिळणार आहे.

आणखी वाचा- वाह! याला म्हणतात खाकी वर्दी; अवघ्या चार तासात मिळवून दिले पैसे

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी सर्वपक्षीय गटनेते व उपस्थित नगरसदस्यांनी सूचना मांडल्या. त्यावर योग्य तो विचारविनिमय करुन त्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापौर ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रशासनास दिले.    

उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक सागर आंगोळकर, तुषार कामठे, शशिकांत कदम, नगरसेविका शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, डॉ. पवन साळवे, डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी सांगवीत नागरीकांना खबरदारीच्या सूचना

जुनी सांगवी : आरोग्य विभागाच्या पथकासमवेत नागरिकांना खबरदारी व करायच्या उपाययेजनांच्या सूचना देत महापौर उषा ढोरे यांनी प्रभाग दौरा केला. यात प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची पाहणी करून प्रतिबंधित क्षेत्रात सर्व उपाययोजना व्यवस्था चोख ठेवल्या जाव्यात नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: make a team to take corona suspects swab says pimpri mayor